मराठी कलाकार नवीन घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. अशातच नववर्षाच्या सुरुवातीला आणखी एका मराठमोळ्या अभिनेता, दिग्दर्शकाने चाहत्यांसह नवीन घर घेतल्याची गुडन्यूज शेअर केली. प्रसाद ओक व मंजिरी ओक यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांच्या नव्या घराची वास्तुशांतीची पूजा आयोजित करण्यात आली होती. नव्यावर्षाच्या मुहूर्तावर त्याने त्याच्या नव्या घरात प्रवेश केला. (Prasad Oak Home)
प्रसादने त्याचं नवं घर त्याने उत्तमरित्या सजवलेलं पाहायला मिळत आहे. ‘ओक ११०२ व ११०३’ असे २ फ्लॅट स्टाईलिश नेमप्लेटने सजवण्यात आले. नुकताच प्रसादने त्याच्या सोशल मीडियावरुन त्याच्या घराचे काही खास फोटो शेअर केले. प्रसादच्या या नव्या घरातील आकर्षक सजावटीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रसादच्या घरातील वूडन विंडो, आकर्षक आसन व्यवस्था, विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती, तसेच ट्रॉफी ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली खास जागा या सगळ्याच गोष्टींनी लक्ष वेधून घेतलं.
प्रसादच्या या नव्या घरी वास्तुशांतीला खास लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रसादचा जवळचा मित्र मंगेश देसाई याने सहकुटुंब त्याच्या नव्या घरी हजेरी लावली होती. “प्रसाद तू व मंजूने घर पाहिजे ही महत्वाकांक्षा ठेवली आणि स्वप्न पूर्ण झालं. मी, शलाका व साहिलकडून तुझे अभिनंदन. मा .मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच मेहनत करणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी असतात. तुझ्या विनंतीला मान देऊन साहेब घरी आले आणि तुला शुभेच्छा दिल्या” असं म्हणत प्रसादच्या नव्या घराच्या भेटीचे फोटो शेअर करत आहेत.
प्रसादच्या या नव्या घरात वास्तुशांतीच्या पूजेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केलं होतं. प्रसादच्या शब्दाखातर एकनाथ शिंदे हे प्रसादच्या नव्या घरी पोहोचले. पुष्पगुच्छ भेट देत त्यांनी ओक कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. प्रसादने मुख्यमंत्रीच्या भेटीनंतर फोटोसह “कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातील असल्याप्रमाणे आमच्यासह बसलात, जेवलात, नीट निरखून आख्खं घर पाहिलंत. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे” असं म्हणत त्यांचे आभार मानले. यावरुन प्रसादच नवं घर एकनाथ शिंदे यांनी निरखून पाहिलं आणि पसंती दर्शवली असं कळतंय.