Majjacha Adda with Ashok Saraf : मराठीतील एक हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांचं नाव आवर्जून घेतले जाते. आजवर त्यांनी नानाविध भूमिका साकारत मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील ‘विनोदाचा बादशाह’ म्हणून अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. अशोक सराफ यांना सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसह सामान्य प्रेक्षकही ‘मामा’ या नावानेच ओळखतात. गेली पाच दशके ते अनेक भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टीला एक नवीन ओळख मिळवून दिली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. (Ashok Saraf Majjacha Adda)
अशोक सराफ यांना सिनेसृष्टीत काम करत आज जवळपास पन्नास वर्षे झाली आहेत. पण आजही त्यांचा उत्साह कायम आहे. ते अनेक कार्यक्रमांना भेट देत असतात आणि या कार्यक्रमांदरम्यान अनेकांशी संवादही साधतात. अशातच त्यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी पत्रकरांच्या प्रश्नांना उत्तरे देत अनेक विषयांवर त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. या मुलाखतीदरम्यान त्यांना “अशोक सराफ नेमके कसे आहेत? त्यांचा स्वभाव नेमका कसा आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा – “झाडाची कत्तल करणाऱ्या लोकांना…”, जितेंद्र जोशीची संतप्त पोस्ट, म्हणाला, “महामार्ग निर्माण करण्यासाठी…”
यावेळी त्यांनी उत्तर देताना असे म्हटले की, “अशोक सराफ म्हणजे नक्की काय हे कोणाला कधी कळलेच नाही. मी सगळ्यांना हसवतो, पण तो माझा धंदा आहे. लोकांना हसवणे हा माझा व्यवसायच आहे. पण तसं पाहायला गेलं तर मी फार गंभीर वृत्तीचा माणूस आहे. तुम्ही जर माझ्या बाजूला अर्धा तास बसून राहिलात तर तुम्ही कोण आहात? असं मी तुम्हाला विचारणारही नाही. तुमची माझ्याशी ओळख असल्याशिवाय मी स्वत:हून तुम्हाला विचारणार नाही आणि हाच माझा मुळ स्वभाव आहे. अभिनय करत असताना मी सगळं विसरुन जातो. कारण तिथे मला वेगळंच चित्र दाखवायचं असतं. नट म्हणजे नक्की काय? तर जे आहे ते त्याच्यापेक्षा वेगळं दाखवणं. हेच त्याचं उत्तर आहे. याचा अर्थ मी विनोदी नाही असं नाही. मलाही विनोद चांगला समजतो. लोकांच्या विनोदाला मी उत्तमरित्या दादही देतो. एवढंच की, मी फार बोलत नाही. मी फार मितभाषी आहे.”
दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी मराठी चित्रपटांची आजची परिस्थिती, सोशल मीडियाचा वापर, त्यांचे साधे राहणीमान, आताच्या विनोदाचा दर्जा, त्यांचं लक्ष्मीकांतबरोबर असलेलं नातं अशा अनेक मुद्द्यांवर मुक्तपणे संवाद साधला. तसेच मज्जाच्या टीमच्या प्रश्नांवर अशोक सराफ यांनी आपली रोखठोक उत्तरे देत अड्डा श्रवणीय केला.