Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी नाटक, मालिका व चित्रपटसृष्टीमध्ये ‘विनोदाचा सम्राट’ म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफ यांनी आजवर अनेक कलाकृतींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांतदेखील काम केले आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. विनोदी भूमिकांसह गंभीर भूमिका करण्यातदेखील त्यांची ख्याती आहे. अशोक सराफ यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अशोक सराफ यांनी मज्जाच्या टीमसह दिलखुलासपणे संवाद साधला. (Ashok Saraf Majjacha Adda)
यावेळी “अलिकडे चित्रपटांचे प्रमोशन अधिकाधिक करण्यात येतं. पण याआधी चित्रपटांचं प्रमोशन फार कमी व्हायचं.”याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत अशोक सराफ यांनी असे म्हटले की, “आधी टीव्हीही नव्हता. फक्त हिंदी चित्रपट व रेडिओ असायचे. इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे चित्रपट कधी येणार, चित्रपटगृहामध्ये कधी लागणार याची प्रेक्षक वाट बघत असायचे. मराठीसह हिंदीमध्येही तिच परिस्थिती होती. पण हळूहळू पद्धती सुधारु लागल्या. आता लोकांना आठवण करुन द्यावी लागत आहे की, आम्ही येत आहोत. प्रमोशन सुरु झालं म्हणून लोक चित्रपट बघण्यासाठी येतातच असं नाही. कुठलाही चित्रपट हा चित्रपट काय आहे याच्यावर चालतो. मात्र, हिंदी चित्रपटांची गोष्टच वेगळी आहे. तिकडे शोबाजी जास्त आहे. त्याला काही अर्थ नाही.” असं ते म्हणाले.
यापुढे हिंदी चित्रपटांबाबतही भाष्य करताना ते असे म्हटले की, “मराठी चित्रपट हा जास्तीत जास्त माऊथ पब्लिसिटीवर चालतो. मराठी चित्रपट चांगला आहे हे एकाने दुसऱ्याला सांगितले तर इतर लोक तो चित्रपट बघायला जातात. इतरांच्या सांगण्यावरुन मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट बघायला जातात. हिंदीसारखं ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ असं मराठी चित्रपटांबाबत होत नाही. हल्ली मल्टिप्लेक्सही वाढले आहेत. आमच्यावेळी चित्रपटांचे शो अधिक लागायचे नाहीत. हल्ली चित्रपट बघायला या म्हणून लोकांना बोलवायला लागतं. मराठी चित्रपट बघायला मराठी प्रेक्षकांनाच बोलवायला लागत आहे हे केवढं मोठं दुर्देव आहे. चित्रपटांचं प्रमोशन करावं लागत आहे ही वाईट गोष्ट आहे. पूर्वी पेपरमध्ये फक्त एक जाहिरात यायची. पण आता पेपर कोणी वाचतच नाही. आता सोशल मीडियावर प्रसिद्धी करावी लागते. तरीही प्रेक्षक येतीलच हे सांगता येत नाही.”
आणखी वाचा – लग्नानंतर प्रसाद जवादेची छोट्या पडद्यावर एण्ट्री, मालिकेचा प्रोमो समोर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अशोक सराफ यांनी अनेक मुद्द्यांवर अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला. अनेक विषयांना त्यांच्या खास शैलीत उत्तरे देत ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात गप्पा मारल्या. त्याचबरोबर अनेक प्रश्नांवर त्यांनी त्यांची दुसरी बाजुही मांडली. दरम्यान, अशोक सराफ हे आगामी काळात कोणत्या नवीन चित्रपटांतून त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येणार? यांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे