Milind Gawali Emotional Post : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नुकतीच संपली आहे. गेली पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आणि मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेमुळे चर्चेत राहिलेलं एक पात्र म्हणजे अनिरुद्ध. मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारत होते. मिलिंद यांना या पात्राने अधिक लोकप्रियता मिळवून दिली. सोशल मीडियावरही मिलिंद बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर अभिनेत्याने मालिका संपल्यानंतर सेटला भेट दिल्यानंतरची एक आठवण शेअर केली आहे. यावेळी अभिनेत्याने मालिकेच्या सेटबाबत भावुक भावना व्यक्त केल्या आहेत.
मिलिंद यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “१९ नोव्हेंबर २०२४ ‘आई कुठे काय करते’चं रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं. २० तारखेला मतदान आणि २१ तारखेला ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चं ‘आई कुठे काय करते’च्या सहकलाकारांबरोबर शूटिंग होतं. म्हणून मग २२ तारखेला, म्हणजेच काल माझ्या मेकअप रुममध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यामध्ये गेलो. बंगल्याचा सेटिंगचा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं, मला आमचा समृद्धी बंगला आधी ओळखूच आला नाही. हिच का ती वास्तु जिथे आम्ही पाच वर्ष स्वतःचं घर समजून बिनधास्त वावरत होतो. गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू , प्रोजेक्टर गुंडाळून ट्रकमध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे तसाच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत”.
पुढे त्यांनी असं लिहिलं आहे की, “आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजनशाही सर, आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता, अगदी पाच वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं. त्यातली माणसं खरी खरी वाटत होती, आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली, एका क्षणात ते घर नव्हतं तर एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं यालाच जीवन असं म्हटलं जातं. बहुतेक, आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपतीच्या मुर्त्या बनवल्या जातात, रोज तिची आराधना पूजा केली जाते आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करुन टाकली जाते. तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकेंचं होत असावं. खरंतर हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, this is an imaginary world, illusionary world, एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं, एक कथा येते, त्या कुटुंबाला शोभणार घर, आर्ट डायरेक्टर तयार करतो. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करुन त्या घरामध्ये आणतो”.
पुढे त्यांनी असं लिहिलं आहे की, “स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरुम, कोणाला विश्वास बसणार नाही पण या समृद्धी बंगल्यामध्ये ४० लोकेशन तयार केली गेली होती. अक्षरशः कोर्ट रुमपण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसेस, आश्रम, हॉस्पिटल्स, ९०% शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं, फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो. ते पण दोन चार किलोमीटरच्या परिसरात, तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डी के पीच्या ‘अनुपमा’च्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण dismantle केलं, पण मी मात्र त्यातलं तुळशीचे रोप माझ्यासाठी राखून ठेवलं, ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणाल नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय”.