सगळ्यांना खळखळवून हसवणाऱ्या, सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेता कुशल बद्रिके याने त्यांच्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. कुशल उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो उत्तम लेखकही आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याची लिखाणशैली प्रेक्षकांसमोर मांडत असतो. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नेहमीच तो चाहत्यांसह काही ना काही शेअर करत संपर्कात राहत असतो. कुशलने केलेल्या शेरोशायऱ्या रसिक प्रेक्षकांना विशेष आवडतात.(Kushal Badrike Post For Wife)
कुशल सोशल मीडियावरुन त्याच्या कुटुंबरोबरचे अनेक फोटोस शेअर करताना दिसतो. त्याच्या पत्नी व लेकाबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो तो नेहमीच शेअर करत असतो. कुशलचा सुनयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यातील बॉण्ड हा खूपच खास आहे. त्यांच्यातील हा खास बॉण्ड अनेकदा त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअरदेखील केला आहे. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच या फोटोखाली त्याच्या खास शैलीत कॅप्शनही लिहितो. त्याच्या या कॅप्शनमुळे चाहत्यांसह साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. अशातच पत्नीच्या वाढदिवसानिमित्त कुशलने केलेली भावुक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
कुशलने सुनयनाबरोबरचे फोटो पोस्ट करत, “संसार म्हंटल की व्यवहार आला आणि व्यवहार म्हंटल की हिशोब. आता हिशोब लावला, ‘तुझ्या-माझ्या’ नात्याचा, बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी. आपल्या पहिल्या घराचं बुकिंग करण्यासाठी आपण तुझी एकएक पॉलिसी मोडली होती, आता पुन्हा नवीन घर घेता येईल पण ती ‘ती वेळ’ परत करण्याची पॉलिसी अजून कोणत्याच कंपनीकडे नाही. एका दसऱ्याला ‘झेंडूची फूलं’ परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लावून साजरा केलेला दसरा आठवत आहे. आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू? सांग” असं म्हटलं आहे.
यापुढे त्याने लिहिलं आहे की, “अक्षय तृतीयेला सोनं घ्यायचं, संक्रांतीला काळी साडी नेसायची अशा सगळ्या ‘प्रथा’ माहीत होत्या तुला, पण तुझा अवघा जन्म माझ्या ‘व्यथा’ जपण्यात गेला यार. आता परवा परवाचीच गोष्ट नाही का, मानसिक त्रासाच्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठीवरुन हात फिरवत बसली होतीस. ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करु शकणार आहे मी? माझ्यासाठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची मला परतफेड करता येणार नाही. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवांपलिकडे मला काहीही देता येणार नाही. सॉरी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा” असं म्हणत त्याने त्याच्या लाडक्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. कुशलच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी सुनयनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.