Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खान व रीना दत्ता यांची मुलगी आयरा खानने नुपूर शिखरेसह लग्न केले. नोंदणीकृत विवाह त्यानंतर उदयपूरमध्ये भव्य विवाहसोहळा हे सर्व झाल्यानंतर या जोडप्याच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन काल म्हणजेच १३ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले. या रिसेप्शन पार्टीचे अनेक व्हिडीओ व फोटोही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत. त्यांच्या या भव्य रिसेप्शन पार्टीच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
गेले काही दिवस बॉलिवूड विश्वात एकाच लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ते लग्न म्हणजे आयरा खान व नुपूर शिखरे या जोडीचं. मुंबईमधील ताज एंडस या हॉटेलमध्ये या दोघांचे कायदेशीर पद्धतीने लग्न पार पडले. त्यानंतर भव्य लग्नसोहळा व लग्नापुर्वीच्या विधींसाठी ते उदयपूर येथे रवाना झाले. उदयपूर येथील ताज पॅलेस येथे आयरा व नुपूरची मेहंदी, संगीत व लग्नसोहळा पार पडला. यावेळी जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींनी आयरा व नुपूरसह धमाल मस्ती केलेली पाहायला मिळाली.
त्यांनतर आयरा व नुपूर यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आला. यावेळी बॉलिवूड कलाकारांसह अनेक दिग्गज मंडळींनी आमिरच्या लेकीच्या लग्नाला हजेरी लावली होती. या ग्रँड रिसेप्शनसाठी आयरा व नुपूर यांचा खास लूक लक्षवेधी ठरला. दोघांच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी नवविवाहित आयरा लाल लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तर नववधू नुपूर देखील काळ्या शेरवानीमध्ये खूपच सुंदर दिसत होता. आमिर खाननेही या कार्यक्रमासाठी काळ्या रंगाचा सूट निवडला, ज्यामध्ये तो खूपच फॅशनेबल दिसत होता.
आयरा व नुपूरच्या या ग्रँड वेडिंग रिसेप्शनमध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. याशिवाय बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंतचे अनेक कलाकार या भव्य रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकर, अनिल कपूर, नागा चैतन्य, हेमा मालिनी, जया बच्चन, राज ठाकरे, बाबिल खान, सोनाली बेंद्रे, सूर्या यांसारख्या अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.