झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. त्यातील एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचं अचूक टायमिंग, अभिनय यामुळे त्याने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. दहा वर्षांनी ‘चला हवा हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर कुशल हिंदी कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. तिथेदेखील त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली. लवकरच तो चित्रपटांमध्येदेखील दिसून येणार असल्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच तो सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेला दिसून येतो. (kushal badrike viral post)
कुशलने सोशल मिडिया नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कुशलची बायको सुनयना व मुलगा झोपलेले दिसत आहेत. त्याने व्हिडीओ शेअर लिहिले आहे की, “आमची ही लग्नात शपथ घेऊन म्हणाली की साता जन्माचा प्रवास आपण एकत्र करु. पण प्रवासात ही झोपून राहील अशी शंका मला झोपेतसुद्धा आली नाही. आमच्या लग्नानंतर काही काळ आम्ही चाळीत राहिलो. तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदा मी शूटिंग संपवून रात्री उशिरा घरी परतलो. दरवाजा वाजवून थकलो. आर्धातास हिने दरवाजा उघडला नाही. फोनदेखील उचलेना. मी घाबरलो आणि स्वतःच्या घरात मागच्या खिडकीने चोरासारखा घरात शिरलो. आतमध्ये जाऊन पाहिले तर आमचा कुंभकर्ण ढाराढुर झोपलेला”.
पुढे त्याने लिहिले की, “हल्लीची गोष्ट सांगायची झाली तर एका हिंदी कार्यक्रमाचे शूट संपवून उशिराने घरी परतलो. (मी आता घराची किल्ली आठवणीने घेऊन जातो) मी दरवाजा उघडला आणि आत गेलो. तर हिला झोपेतच कोणाचीतरी चाहूल लागली आणि हिला वाटलं की घरात एखादा चोर शिरलाय. पण आता चोराने त्रास देऊ नये म्हणून माझी बायको तशीच झोपून राहिली”.
पुढे त्याने लिहिले की, “माझी खात्री आहे की देव जेव्हा कोवाला प्राणी बनवायला गेला असणार. हा प्राणी दिवसातून १८ तास झोपतो. पण देवाची काहीतरी रेसिपी चुकली असणार आणि आमच्या सुनयनाचा जन्म झाला असणार, हिचा हाच स्वभाव माझ्या मुलामध्ये उतरला आहे. ऐन परीक्षेच्या काळात १२ तास झोपतो. अशा अर्थाने खरं तर स्वतःच्या आईची गादी चालवणारा मुलगा महाराष्ट्रात माझ्याच घरात जन्माला आला, असं म्हणायला काही हरकत नाही. पण दोघांच्या या स्वभावामुळे आता माझी झोप उडाली. यावर उपाय म्हणून बायको मला म्हणते, कुशल थोडा वेळ झोप, तुला बरं वाटेल”. दरम्यान या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले असून अनेक जण प्रतिक्रियादेखील देत आहेत.