‘रंगिला’ हा चित्रपट माहीत नसणारे प्रेक्षक हे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतील. यामध्ये उर्मिला मातोंडकरने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाने तिला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली होती. बालकलाकार म्हणून सुरु केलेला अभिनयातील प्रवास तिचा अजूनही सुरुचं आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत राहिली. आठ वर्षांपूर्वी ती काश्मिरी मुसलमान असलेल्या तरुणाबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र आता ते दोघंही विभक्त होण्याचे वृत्त समोर येत आहे. (urmila matondkar on religion change)
उर्मिलाने ३ मार्च २०१६ रोजी मोहसिन अख्तरबरोबर लग्न केले. लग्नानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले. तसेच लग्नानंतर तिने धर्मदेखील बदलला असून नाव मरियम अख्तर मीर असे ठेवले असल्याचे समोर आले होते. मात्र उर्मिलाने हे सर्व नाकारलं होतं. ‘बॉम्बे टाइम्स’बरोबर संवाद साधताना तिने याबद्दल भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, “अशा प्रकारच्या राजकारणाला मी पाठिंबा देत नाही. मुळातच हे महत्त्वाचं नाही. मी माझ्या हिशोबाने आयुष्य जागते. मी आता जी आहे त्यावर मला गर्व आहे. मी कधीच चुका करत नाही असं म्हणायचं नाही. पण मला लाज वाटेल असं कोणतही काम मी आजवर केलं नाही”.
पुढे ती म्हणाली की, “मी ज्या क्षेत्रात होते तिथे नकारात्मकता, गॉसिप अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. माझा धर्म बदलण्याच्या जेव्हा बातम्या समोर आल्या तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी हिंदू आहे. हिंदू धर्माचे पालन करते. आजकाल जो हिंदू धर्म विकला जात आहे त्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर अभिमानाने सांगितलं असतं. पण कोणा इतरांना याबद्दल काहिही देणं-घेणं नसावं”.
दरम्यान आता उर्मिलाचे वैवाहिक आयुष्य सध्या अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. दोघंही लवकरच घटस्फोट घेऊन वेगळे होतील अशा बातम्या समोर येत आहेट. मात्र दोघांनीही अद्याप याबद्दल अधिकृत भाष्य केलं नाही.