प्रचाराचं मैदान असो किंवा सोशल मीडियावरुन ठरावीक पक्षांना मतदान करण्यासाठी केलेलं आवाहन असो… मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सध्याच्या आजूबाजूच्या राजकीय प्रश्नांवर आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत आणि या निवडणुकीच्या लढतीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख सहा पक्षांची लढत होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यासह विविध आश्वासनंही दिली जात आहेत. याच आश्वसनांवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांनी एक खोचक पोस्ट शेअर केली आहे. (Dr. Girish Oak Political Post)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. गिरीश ओक यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून त्यांनी ‘भाबडे’ प्रश्न विचारले आहेत. डॉ. गिरीश ओक यांनी विधानसभेबाहेरचा सेल्फी फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “मला पडलेले दोन भाबडे प्रश्न…पहिला…एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000 देणार म्हणतेय इतरही बरीच पैश्याची आश्वासनं दिली जातायत..पण हे देतायत/देणार कुठून आपल्या टोल,आयकर,जीएसटी मधूनच ना ?मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी”.
आणखी वाचा – स्टार प्रवाहवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप?
यापुढे त्यांनी म्हटलं की, दुसरा प्रश्न… आणि हे जे एटीएमच्या किंवा इतर गाड्यांमधे पैसे पकडले जात आहेत, ते असे विषम संख्येत म्हणजे १ कोटी २७ लाख किंवा २ कोटी ७० लाख असे कसे आहेत. देणाराही असे का देत आहे आणि घेणाऱ्यालाही असे कसे हवे आहेत. की हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांचा पोचवण्याचा मेहनातीला आहेत की पोचवताना ते पोचवणारेच लंपास करत आहेत किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगत आहेत? मला कोणी सांगेल का?”
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मालिकेच्या सेटवर अपघात, रुग्णालयात केलं भरती, आता कशी आहे परिस्थिती?
दरम्यान, यंदाच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात गाजलेला मुद्दा म्हणजे सरकारची लाडकी बहिण योजना. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महायुतीच्या सरकारने १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या याच निर्णयाला आव्हान देत विरोधकांनी महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा करत दर महिन्याला ३००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याच सगळ्यावर डॉ. गिरीश ओक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं म्हणणं पटलं असल्याचंही म्हटलं आहे.