मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक चिंताजनक बातमी समोर येत आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा मालिकेच्या सेटवर अपघात झाला आहे. ‘सुमन इंदोरी’ या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांचा अपघात झाला असून दुखापतीमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अशनूर कौर, अनिता हसनंदानी आणि झैन इमाम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेत निशिगंधा या सुमित्रा मित्तलची भूमिका साकारत आहे. सेटवरील एका दृश्यादरम्यान ही दुर्घटना घडली, ज्यामुळे कलाकार आणि क्रू मेंबर्सलादेखील धक्का बसला आहे. (Nishigandha Wad Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, एका मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण करताना निशिगंधा घसरल्या. त्यामुळे त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना आता पुढचे काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर सुमन इंदोरीचे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले. क्रू मेंबर्सने चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, ते सेटवर प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत.
आणखी वाचा – स्टार प्रवाहवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप?
प्रोडक्शन टीमकडून असं सांगण्यात आले आहे की, “हा एक अनपेक्षित अपघात होता आणि निशिगंधा आता धोक्याबाहेर असल्याबद्दल आम्हाला समाधान वाटत आहे. त्या एक खंबीर स्त्री आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत.” निशिगंधा या मराठीसह हिंदी टेलिव्हिजन व चित्रपटांचा एक लोकप्रिय चेहरा आहेत. अशातच त्यांच्या अपघाताच्या माहितीने अनेक चाहते मंडळी चिंतेत आहेत.
दरम्यान, ९०च्या दशकातील मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘मेरी गुडिया’, ‘कभी कभी इत्तेफाक से’, ‘रब से है दुआ’ आणि इतर मालिकांमध्येही काम केले आहे. मराठी नंतर निशिगंधा वाड यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील नाव अजमावलं आणि सफलता मिळवली.