वाढदिवस म्हटला की जंगी सेलिब्रेशन आलेच… सजावट, औक्षण, गोडाधोडाचं जेवण किंवा मग मोठ-मोठ्या पार्ट्या… पण अनेकजण या मोठमोठ्या सेलिब्रेशनला छेद देत आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करतात. असाच छेद देत एका मराठी अभिनेत्याने त्याचा यंदाचा वाढदिवस साजरा केला आहे. ज्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. काल (३१ जानेवारी) रोजी त्याचा वाढदिवस साजरा झाला. अंकुशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर काल शुभेच्छांचा वर्षाव झाला. अशातच त्याने केलेल्या कृतीमुळे त्याच्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या फोटोसह त्याच्या कामाबद्दलची माहितीदेखील शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून अभिनेत्याच्या अनोख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास झलक पाहायला मिळत आहे. अंकुशने तो राहत असलेल्या परिसरात गरिबांना अन्नदान करत त्याचा यंदाचा वाढदिवस साजरा केला आहे.
सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर तन्मय पाटेकरने त्याच्या सोशल मीडियाद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात अभिनेता अंकुश व दीपा चौधरी तो राहत असलेल्या ठिकाणी अन्नदान केले आहे. गरिबांना स्वत:च्या हाताने अन्नदान करत त्याचा हा खास वाढदिवस साजरा केला आहे. तसेच या व्हायरल व्हिडीओमध्ये अंकुश चौधरी पत्नीसह केक करतानाही दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, साध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अभिनेत्याच्या या आगळ्या वेगळ्या कृतीचे कौतुक होत आहे. या व्हायरल व्हिडीओखाली चाहत्यांनीही कमेंट्स करत अंकुश चौधरीचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी त्याला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छाही दिल्या आहेत.