मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे रमेश देव आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ पाडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सीमा देव. रमेश देव व सीमा देव यांचे सुपुत्र अजिंक्य देव हेदेखील मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांच्या अभिनयासह त्यांचं देखणं व्यक्तिमत्त्व सगळ्यांनाच भावतं. अजिंक्य सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपले अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहतेही भरभरून प्रतिसाद देतात. अशातच त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. अजिंक्य यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Ajinkya Deo On Instagram)
अजिंक्य यांनी नुकतीच कोणत्यातरी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा आनंद घेतानाचा व्हिडीओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अजिंक्य कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत असले, तरी त्यांच्या एका कृतीमुळे ते टीकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या तोंडात सिगरेट असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रॉलिंगला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक नकारात्मक कमेंट्स करत त्यांच्यावर टीका केली आहे.
“स्वर्गीय रमेश देव यांनी रसिकांचे प्रेम कमावलं ते मुलाने असे वेडे चाळे करून गमावलं, आपल्याकडून असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती, बॉलिवूडमध्येसुद्धा असं करताना लोकांना आवडले नाही आहे, तुमचा खुप आदर वाटतो तो आदर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, आता विचारणारा कोणी नाही म्हणून असं करत आहात का?, रमेश देव यांना जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं सर, दारू पिऊन फुल्ल आहेत राजे, हा तर एकदम टल्ली झाला आहे, सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती” अशा अनेक कमेंट्स करत अजिंक्य यांनी केलेल्या कृतीला असमर्थन दर्शवले आहे. त्याचबरोबर काहींनी “धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे, सर तुम्हाला दारू खूप जास्त झाली आहे, कृपया काळजी घ्या, व्यसन तुमच्या आरोग्याशिवाय तुमच्या जीवनाला व परिवारालासुद्धा उध्वस्त करतं त्यामुळे व्यसन करू नका” असं म्हणत त्यांच्याविषयी काळजीही व्यक्त केली आहे.
दरम्यान, अजिंक्य देव यांनी आतापर्यंत मालिका व चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बराच काळ ते मनोरंजनसृष्टीपासून लांब असले तरी आगामी काळातही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या आगामी चित्रपटांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. त्याचबरोबर या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकेसाठीही चाहतेही आतुर आहेत.