नुकताच प्रदर्शित झालेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान अभिनेता बॉबी देओलच्या धाडसी भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बॉबीने चित्रपटात अबरार या मूक पात्राची भूमिका साकारली आहे. त्याच्या चित्रपटातील या अभिनयाचे भरपूर कौतुक होत असतानाच, या चित्रपटातील त्याच्या वैवाहिक बलात्काराच्या दृश्याबाबत बरेच वादही समोर आले आहेत. या दृश्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान एका मुलाखतीत बॉबीने यावर मौन सोडले असल्याचं पाहायला मिळत आहे. (Bobby Deol On Marital Rape Seen In Animal)
‘अॅनिमल’मधील बॉबी देओलच्या वैवाहिक बलात्काराच्या सीनवरून बराच वाद सुरू आहे. यासंदर्भात ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बॉबीने सांगितले की, “हा सीन चित्रित करताना मला कोणताही संकोच वाटला नाही”. बॉबी पुढे म्हणाला. “ज्या क्षणापासून मी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल ऐकले, तेव्हापासून मला माहित होते की मी एक शब्दही न बोलता त्यात बरेच काही करू शकतो. प्रत्यक्षात, एकही शब्द न बोलता, मला एक प्रकारची ऊर्जा मिळाली ज्यामुळे माझ्यातील काहीतरी बाहेर आले. जेव्हा मी अभिनय करत होतो, तेव्हा मला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नव्हता” असंही तो म्हणाला.
त्याच्या या चित्रपटातील ग्रे शेडबद्दल बोलताना, बॉबीने स्पष्ट केले की, “मी केवळ हे पात्र साकारत होतो, जे पात्र क्रूर आहे, ते पात्र एक दुष्ट माणूस आहे आणि तो आपल्या स्त्रियांशी असे वागतो, कारण ते पात्र असंच आहे. मात्र तो त्याच्या तीन बायकांसह खरोखर रोमँटिक आहे” असंही तो म्हणाला.
‘अॅनिमल’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या १० दिवसांत ४३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर ‘अॅनिमल’ने जगभरात ६६० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला असून आता तो ७०० कोटींचा आकडा पार करण्याच्या मार्गावर आहे.