Aastad Kale On His Wife : अनेक मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता आस्ताद काळे. सध्या आस्ताद रंगमंचाकडे वळलेला पाहायला मिळतोय. सिनेइंडस्ट्रीबरोबरचं तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरेचदा चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. आस्ताद हा त्याच्या लग्नामुळे बराच चर्चेत राहिला आहे. आस्तादने अभिनेत्री स्वप्नालीसह लग्नगाठ बांधली. आस्ताद व स्वप्नाली यांची मालिकेदरम्यान भेट झाली आणि त्यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. आस्तादबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेताना स्वप्नालीने बराच वेळ घेतला. आस्तादच्या आयुष्यात स्वप्नालीचं अग्रगण्य स्थान आहे. आस्तादच्या वाईट काळात स्वप्नालीने त्याला खूप मोठी साथ दिली. याबाबत आस्ताद स्वतःही बरेचदा मुलाखतींद्वारे बोलला आहे.
अशातच आस्तादने ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्युब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्वप्नालीबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना तो म्हणाला, “मम्माच्या तेराव्याला आम्ही काही विधी वगैरे करायचं ठरवलं नाही. आमचा त्यावर विश्वास नाही. पण त्या दिवशी नातेवाईक, मित्रमंडळी सगळेच भेटलो. न्यूट्रल होतो. बाबा तेव्हा मम्मा बद्दल बोलला. सगळ्यात शेवटी त्याने असं म्हटलं की, ही जी आमची मुलगी आहे. हिचे जे उपकार आहेत, तू राग मानून घेऊ नकोस स्वप्नाली, पण हे असं करायला फार मोठं मन लागते. स्वप्नालीने मम्माचं जे केलं आहे ना ते कोणीच करणार नाही. हॉस्पिटलमधून आल्यावर मम्मा १२ दिवस घरी होती आणि बाराव्या दिवशी ती गेली. ते बारा दिवस नशिबाने मीदेखील पुण्यात होतो. अशा अनेक मुली आजही जगात असतील म्हणूनच तर जग चाललंय. पण मी पाहिलेली ही पहिली मुलगी होती”.
पुढे तो म्हणाला, “पण माझा तो वाईट काळ होता त्यावेळी मी स्वप्नालीच्या प्रेमात पडलो होतो. तिला होकार द्यायला वा तिला मी आवडतो असं समजायला सात ते आठ महिने लागले. मग त्याच्या पुढील दीड एक वर्ष तिने मला सांगायला लावले. त्याच्यानंतर एक वर्षाने आम्ही एकत्र राहायला लागलो. तर तो साडेतीन वर्षांचा मधला काळ तिने माझं कधीही दुःख गोंजारलं नाही. याचा आधार बनायचा नाही हे तिने अचूक ओळखलं, याला आता आधार दिला तर हा नक्कीच खचेल. कारण मी स्वतः आखून घेतलेल्या कंफर्ट झोनमध्ये होतो. या सगळ्या माझ्या वाईट सवयींच्यावेळी स्वप्नाली जशी माझ्या आयुष्यात आली तेव्हा तिने कधीही मला मारुन मुटकून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला नाही”.
आस्ताद पुढे असंही म्हणाला की, “ती कधीही माझं दुःख गोंजारायला आली नाही, तिने इतकंच सांगितलं की तुझं हे वागणं मला आवडत नाही. तिच्या या अशा वागण्यामुळे मी चुकतोय म्हणून मी बदललो हे मला पटलं. समोरच्याने मदत केली आणि मी बदललो हे चांगलंच आहे पण मला माझी चूक कळल्यावर मी बदललो हे त्याहून चांगलं आहे. माणूस म्हणून मी वाईट नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो”.