Vikrant Massey On Retirement : ’12वी फेल’ अभिनेता विक्रांत मेस्सीने अलीकडेच चित्रपटांमधून ब्रेक घेण्याबाबत पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या बातम्या सर्वत्र येऊ लागल्या. सोमवारी सर्वत्र विक्रांत मेस्सीच्या निवृत्तीची चर्चा होती. अभिनेत्याच्या या निर्णयामुळे चाहते खूप दुःखी झाले. मात्र, आता अखेर विक्रांतने या बातम्यांवर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्याच्या चित्रपटसृष्टीला निरोप देण्यामागच्या कारणांबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. सध्या विक्रांत मेस्सी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आला. प्रदर्शनानंतर हा चित्रपट अनेक वादात अडकला आहे. विक्रांत चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा विक्रांत मेस्सी आणि त्याच्या नऊ महिन्यांच्या मुलाला धमक्या आल्या होत्या. यामुळे त्याने अभिनयसृष्टीतून काढता घेतला.
‘न्यूज१८ शो’सह बोलताना विक्रांत म्हणाला की, तो निवृत्त होत नाहीये. त्याला विश्रांतीची गरज आहे. यावेळी बोलताना विक्रांत म्हणाला, “मी निवृत्त होत नाही आहे. मी फक्त थकलो आहे आणि मला दीर्घ विश्रांतीची गरज आहे. माझी तब्येतही चांगली नाही. लोकांनी माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ घेतला”. विक्रांत चित्रपटसृष्टी सोडणार असल्याची पोस्ट शेअर करत म्हणाला होता की, “गेली काही वर्षे आणि त्याआधीचा काळ आश्चर्यकारक होता. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, परंतु जसजसे मी पुढे जात आहे तसतसे मला जाणवले की एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणूनही आता स्वतःला साजेशी आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. २०२५ साली आपण शेवटचे भेटणार आहोत. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा एकदा धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी आणि मध्ये जे काही झालं त्यासाठी मी कायम आभारी राहीन”.
पिंकव्हिलाशी बोलताना विक्रांतने या निर्णयाबाबत खूप मोठा खुलासा केला होता. यावेळी बोलताना विक्रांत म्हणाला की, “या लोकांना माहित आहे की मी नुकताच एका मुलाचा बाप झालो आहे, ज्याला अजून चालताही येत नाही. ते लोक त्याचे नाव ओढत आहेत. मला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. आपण कोणत्या समाजात राहत आहोत?”, असा सवालही त्याने यावेळी बोलताना केला होता. मात्र आता अभिनेत्याने त्याने केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असल्याचं म्हणत तो पुन्हा इंडस्ट्रीत परतणार असल्याचं म्हटलं.
विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात हा चित्रपट पाहिला आणि चित्रपटाचे व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. हा चित्रपट गोधरा घटनेवर बनला आहे.या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या चित्रपटात राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.