Milind Safai Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. या धक्क्यामधून अजूनही कलाविश्व सावरलं नसताना आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारे सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झालं आहे. मिलिंद गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज सकाळी त्यांची या आजाराशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. संपूर्ण कलाविश्वाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मिलिंद यांच्या निधनाबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांच्या निधनामागचं कारण सांगितलं. जयवंत वाडकर म्हणाले, “अभिनेते मिलिंद सफई यांचे कर्करोग या आजाराने निधन. भावपूर्ण श्रद्धांजली”.
मिलिंद यांनी आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तसेच त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांना भूरळ पाडणाऱ्या होत्या. त्यांनी लकडाऊन बी पॉझिटिव्ह, प्रेमाची गोष्ट, थ्यँक्यु विठ्ठला, मेकअप, पोस्टर बॉईज सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच आई कुठे काय करते, आशिर्वाद तुझा एकविरा आई, सांग तू आहेस का, १०० डेज, पुढचं पाऊल सारख्या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिल्या.