संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याच्या पाचवीला पूजलेला असतो. या संघर्षातून कुणीही सुटलेलं नाही. हा संघर्ष प्रत्येकाच्याच वाटेला येत असतो आणि याच संघर्षावर मात करत अनेकजण त्यांचा नवीन स्थान निर्माण करतात. असंच संघर्षावर मात करत मराठीतील एका कलाकार जोडीने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे आणि ही कलाकार जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद ओक व पत्नी मंजिरी ओक. त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं. त्या दोघांनी मिळून शून्यातून विश्व निर्माण केलं आहे.
प्रसाद ओकला आतापर्यंत मिळालेल्या त्याच्या यशात मंजिरीचाही मोठा वाटा आहे. प्रसादच्या पहिल्या प्रोजेक्टपासूनच मंजिरीने प्रसादला मदत केली आहे. पण त्याआधी मंजिरी ही जवळपास २३ वर्ष गृहिणी म्हणून घर सांभाळत होती. त्याकाळी मंजिरी मार्केटिंग क्षेत्रात काम करत असे आणि यावेळी तिला एका भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. हा अनुभव स्वत: मंजिरीने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. एका मुलाखतीत मंजिरीने ती नऊ महिन्यांची गरोदर असताना चालत्या ट्रेनमधून पडली असल्याच्या प्रसंगाबद्दल सांगितले.
मंजिरीने ‘असोवा’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने असं म्हटलं होतं की, “गृहिणी बनणे हा एक मोठा टास्क असतो. मी २३ वर्ष पूर्णपणे गृहिणी होते. २ वर्षानंतर माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता. तेव्हा मी ९ महिन्यांची गरोदर होते. मी माझ्या कामावरुन निघाले आणि मला विरार फास्ट ट्रेनमधून एकदम ढकलून दिलं गेलं. त्यावेळी माझा मोठा मुलगा पोटात होता आणि त्यावेळी माझे ९ महिने पूर्ण झाले होते. त्यामुळे माझी कधीही डिलिव्हरी होणार होती.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “त्यावेळी मी फास्ट ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडले. पण सुदैवाने मी माझ्या पोटावर नाही पडले. मार्केटिंगच्या कामानिमित्त मी त्याआधी २ वर्षे प्रवास करतच होते. त्यामुळे प्रवासाचा मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण त्या एका घटनेमुळे मी खूप घाबरली. त्याच संध्याकाळी हे जेव्हा प्रसादला सांगितलं तेव्हा तो म्हणाला ही सगळं बस्स झालं. आता तू आता घरी राहा आणि तोपर्यंत दूरदर्शन सुरू झालं होतं. इतर चॅनेल नव्हते. पण दूरदर्शनवर बंदिनी, दामिनी या मालिका सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आमचं भागेल किंवा घराचे भाडे दिले जाईल इतके पैसे घरी येत होते. म्हणून मग मी ती नोकरी सोडली आणि तेव्हापासून हिरकणीचं शूटिंग सुरू होईपर्यंत मी पूर्णपणे गृहिणी म्हणून घर सांभाळलं आणि मग हिरकणीसाठी प्रसादबरोबर पुन्हा काम करायला सुरुवात केली.”