‘झलक दिखला जा ११’ या लोकप्रिय रिऍलिटी शोचा धमाकेदार फिनाले नुकताच संपन्न झाला आहे. तब्बल साडेतीन महिने चाललेल्या या खडतर संघर्षानंतर हा रिऍलिटी शो संपला. मनीषा राणी, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा, श्रीराम चंद्र व धनश्री वर्मा या ५ स्पर्धकांनी महाअंतिम फेरीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आणि प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली. दरम्यान मनीषा राणी या स्पर्धकाने शोएब इब्राहिम व अद्रिजा सिन्हा यांच्यावर मात करत ट्रॉफीचा मान पटकावला. हा रिऍलिटी शो जिंकल्यानंतर मनीषा राणीने आपला विजय तिच्या चाहत्यांना समर्पित केला. (Jhalak Dikhhla Jaa 11 Winner Manisha Rani)
काल म्हणजेच शनिवारी रात्री ‘झलक दिखला जा ११ ‘ या शोचा विजेता घोषित करण्यात आला. यांत मनीषा राणीने ‘झलक दिखला जा ११’ची ट्रॉफी जिंकली आहे. ट्रॉफीसह मनीषाला ३० लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. विजेतेपद जिंकल्यानंतर मनीषा मीडियाशी बोलताना दिसली. दरम्यान तिने तिच्या भविष्यातील योजनाही प्रसारमाध्यमांसह शेअर केल्या. विजेतेपद पटकावल्यानंतर मनीषा राणीने ट्रॉफी हातात घेत, “मी नेहमीच म्हणते की, मला माझ्या वडिलांपेक्षा माझ्या चाहत्यांवर जास्त विश्वास आहे आणि त्यांनी हा शो मला जिंकायला लावला. मी मला मिळालेलं हे बक्षीस माझ्या सर्व चाहत्यांना समर्पित करु इच्छिते. तुमचे खूप खूप आभार”, असं ती म्हणाली.
हा शो जिंकल्यानंतर मनीषाचा कोरिओग्राफर आशुतोष पवार भावुक झालेला पाहायला मिळाला. तो म्हणाला की, “मी या सीझनचा विजेता आहे यावर विश्वास बसत नाही”. त्यानेदेखील चाहत्यांचे आभार मानत म्हटलं की, जर तो सहाय्यक नृत्यदिग्दर्शक बनून इथपर्यंत पोहोचू शकला तर प्रत्येकजण आपलं स्वप्न सत्यात आणू शकतं. मनीषा राणीचा बिनधास्त स्वभाव व किलर डान्सने तिला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळे ठरविले. अल्पावधीतच तिने अनेकांची मने जिंकली आहेत”.
केवळ प्रेक्षकच नाही तर फराह खान, अर्शद वारसी व मलायका अरोरा हे तीनही जज ‘बिहार की लडकी’साठी प्रचंड खूश असलेले दिसले. मनीषाच्या विजयाची बातमी समोर आल्यानंतर चाहतेही खूप खूश आहेत आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत. मनीषा राणी तिच्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. अनेकवेळा तिने या शोमध्येही नृत्यासह तिच्या अभिनयाने जजची मने जिंकली आहेत. मीडियाशी संवाद साधताना मनीषा म्हणाली की, “मला आता चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. मला कार्तिक आर्यनची हिरोईन व्हायचे आहे. मला तो खूप आवडतो. त्याच्यासह चित्रपट करण्याचे माझे स्वप्न आहे. मी लहानपणापासून हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहत होते. मला शाहिद कपूर खूप आवडतो. त्यांचा ‘इश्क-विश्क’ हा चित्रपट मी अनेकदा पाहिला आहे. तसेच, मला सलमान खानबरोरबही काम करायला आवडेल”, असंही ती म्हणाली.