मागील काही दिवसांपासून अंबानी कुटुंबीय विशेष चर्चेत आले आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनची जोरदार तयारी सुरु असलेली पाहायला मिळाली. सुमारे सलग तीन दिवस हा प्री-वेडिंग फंक्शन पार पडणार आहे. आज या सोहळ्याची सांगता होणार आहे. या खास फंक्शनसाठी बॉलिवूड कलाकार, तसेच परदेशी दिग्गज मंडळी, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या सोहळ्यात कलाकारांचे खास सादरीकरणही पाहायला मिळाले. सिनेसृष्टीतील सिनेतारकारांना त्यांच्या कुटुंबासह यावेळी आमंत्रित करण्यात आलं होतं. (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding)
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड तारकांनी आपल्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यातील खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, दीपिका पदुकोण व रणवीर सिंगचा एक व्हिडीओ समोर आला असून तो व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका व रणवीर यांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. येत्या सप्टेंबर महिन्यात ते त्यांच्या गोंडस बाळाला जन्म देणार आहेत. ही बातमी कानावर येताच दीपिका व रणवीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळाला.
अंबानी यांच्या फंक्शनला येताना तर एअरपोर्टवर पापाराझींनी केक देत त्यांना हटके शुभेच्छा दिल्या. दोघांनी केक कापून एकमेकांना भरवत सर्वांचे आभारही मानले. अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दीपिका व तिचा पती रणवीर सिंग धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसले. अनंत व राधिकाच्या संगीत सेरेमनीमध्ये हे जोडपे ‘नगाडा संग ढोल’ व ‘गल्लन गुडियां’वर थिरकताना दिसले. दीपिकाने काळ्या, पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परीक्षण केला होता तर रणवीर निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. याशिवाय दोघांनी एकत्र गरबाही खेळला.
दोघांचा डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दीपिकाने नुकतेच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत हा डान्स व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्रीवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आता स्वत:ला जपा. गर्भधारणेदरम्यान नृत्य करणे हे आई व मूल दोघांसाठीही चांगले नाही”. तर आणखी एका यूजरने लिहिले की, “दीपिका तिचा जीव धोक्यात घालत आहे”.