दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते कुंद्रा जॉनी यांचं निधन झालं आहे. ते ७१ वर्षांचे होते. मंगळवारी (१७ ऑक्टोबर) केरळमधील कोलम येथे असणाऱ्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत माळवली. कुंद्रा जॉनी यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांचं संपूर्ण कुटुंबही कोलमडून गेलं आहे. (kundara johny death)
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, कुंद्रा जॉनी यांना मंगळवारी हृदय विकाराचा झटका आला. दरम्यान त्यांना लगेचच उपचारासाठी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. डॉक्टरांनीही लगेचच त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र कुंद्रा जॉनी यांच्यावर उपचार सुरु असतानाच होत्याचं नव्हतं झालं. कुंद्रा जॉनी यांच्या अचानक जाण्याने चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच कलाकार मंडळीही हादरुन गेली आहेत.
आणखी वाचा – “ही सून आहे का?” अरुण कदम यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, बायकोने दिलं उत्तर, म्हणाल्या, “मी…”
कुंद्रा जॉनी यांनी त्यांच्या चार दशकांच्या करिअरमध्ये ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. १९७९मध्ये ‘नित्य वसंतम’ या चित्रपटामधून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. मल्याळम चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या. नकारात्मक भूमिकांमुळेच त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. तसेच त्यांच्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.
मल्याळममधील सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी कुंद्रा जॉनी यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली. त्यांनी फेसबुक अकाऊंटवर कुंद्रा जॉनी यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली. कुंद्रा जॉनी यांनी आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांबरोबरही काम केलं. अद्यापही कुंद्रा जॉनी यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार कधी होणार? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.