बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे ६२ वर्षीय वडील अनिल मेहता यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत वांद्रे पोलीस अद्याप स्पष्टपणे काहीही सांगू शकले नाहीत. कारण, अनिलच्या घरातून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे म्हातारपण व आजारपण यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी उचललेले पाऊल असल्याचा वांद्रे पोलिसांचा सिद्धांत आहे. मात्र, पोलीस सध्या एडीआर नोंदवून कुटुंबीयांचे जबाब नोंदवून तपासाच्या प्रक्रियेत व्यस्त आहेत. (Malaika Arora Father Death)
शवविच्छेदन अहवाल व फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच अनिलने वांद्रे (पश्चिम) येथील आयेशा मनोर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या का केली हे स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घरात ते आपल्या पत्नीबरोबर राहत होते, ज्यांचा अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते पुन्हा एकत्र राहू लागले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेहता यांची ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी फ्लॅटमध्ये हजर होती. अनिल बाल्कनीत बसल्याचे सीसीटीव्हीत उघड झाले. रात्री ९ नंतर ते बाल्कनीत फिरताना दिसले आणि सकाळी १०.३० ते ११च्या दरम्यान त्यांनी इमारतीवरुन उडी मारली. मात्र, अनिल मेहता यांचे कुटुंबीय याला आत्महत्येचे प्रकरण म्हणत आहेत.
पोलिसांनी अपघाती मृत्यूची (एडीआर) नोंदही केली आहे. कारण, अनिलच्या फ्लॅटमधून किंवा मृत व्यक्तीकडून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. अनिलच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिला याच इमारतीतील एका रहिवाशाकडून घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी असेही सांगितले की, बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये उभ्या असलेल्या कारजवळ एक व्यक्ती उभा होता, ज्याने अनिल यांना पडताना पाहिल्याचा दावा केला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने प्रत्यक्षदर्शीचे जबाब तपासण्यात व्यस्त आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हे दिवसभरातील घडामोडी डायरीत लिहायचे. तपास पथक त्या डायरीचा शोध घेत आहे, त्यामुळे कदाचित त्यांनी त्यामध्ये घटनेशी संबंधित काही गोष्टींचा उल्लेख केला असावा. डायरीतून त्यांच्या कृत्यामागचे नेमके कारण समोर येईल, अशी आशा पोलिसांना आहे. सुसाईड नोट न मिळाल्याने मृत्यूच्या खऱ्या कारणापर्यंत पोलिस पोहोचू शकलेले नाहीत. अनिलच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर मलायका व तिचे पुण्यातील कुटुंबीय वांद्रे येथील तिच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचले. अनिलच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.