सध्या हुकमी हवा कोणाची आहे? राजकारणातील उलटसुलट हवा म्हणत नाही हो की उन्हाळ्यात अधूनमधून चक्क वीजांचा कडकडाट होत पाऊस का पडतोय यावर बोलत नाही. मनोरंजन क्षेत्रात ‘बाराही महिने ‘ हुकमी ग्लॅमरस पीक येतेय ते पुरस्काराचे आणि त्यांच्या दिमाखदार देखण्या इव्हेन्टसचे. कोणी त्याला टी.व्ही. शो म्हणतयं ते सोडून द्या. अनेक गोष्टींसाठी आज पुरस्कार दिले/घेतले जाताहेत. त्याने प्रोत्साहन मिळते, ‘मीच पुरस्कार पटकावला ‘ असा इगो सुखावतो, ‘मला नामांकन होते ‘ अशी प्रोफाईलमध्ये नोंद वाढते.(Mahesh Kothare Sachin Pilgoankar)
अनेक पुरस्कारांमधील एक बालकलाकाराचा पुरस्कार. तोही खूप महत्वाचा, आत्मविश्वास वाढवणारा आणि त्याच्या काही मोजक्या खास आठवणी सांगतो. तुम्हालाही माहित्येय, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी साठच्या दशकात बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरु केली. विशेष म्हणजे लागोपाठच्या वर्षी या दोघांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून अभिनयाचा पुरस्कार प्राप्त झाला. १९६३-६४ साली सचिन पिळगावकरला राजा परांजपे दिग्दर्शित ‘हा माझा मार्ग एकला’साठी तर १९६४-६५ साली महेश कोठारेला राम गबाले दिग्दर्शित ‘छोटा जवान ‘साठी मिळाला.
१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर १९६२ साली राज्य शासनाकडून हा चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येऊ लागले. पण पहिल्या सोहळ्यात बालकलाकाराचा पुरस्कार नव्हता. पण ‘हा माझा मार्ग एकला ‘ या चित्रपटातील बालकलाकार सचिन पिळगावकरच्या कामाचे सर्वत्र विशेष कौतुक झाल्याने हा पुरस्कार सुरु करण्यात आला. आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाचा पुरस्कार पटकावण्यात हे दोघेही यशस्वी ठरले.
ही स्टोरी इतक्यावरच थांबत नाही महेश कोठारेने वयात आल्यावर नायक/निर्माता/दिग्दर्शक/वितरक अशी चौफेर ‘धडाकेबाज ‘ वाटचाल सुरु केली आणि त्याच ‘झपाटलेला ‘ वाटचालीत एक चित्रपट होता, माझा छकुला ( १९९४). त्यात महेश कोठारेचा मुलगा आदिनाथ कोठारे बालकलाकार होता आणि आदिनाथला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य शासनाकडून पुरस्कार प्राप्त झाला. एक छान योगायोग म्हणता येईल.
हे देखील वाचा=हिंदीवाल्यांचे मराठीत पाऊल भारी कौतुकाचे
असाच आणखीन एक छान योगायोग घडला सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकुलती एक ‘ ( २०१३) या चित्रपटाव्दारे श्रिया पिळगावकरने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताच आपल्या या पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट नवतारका’ हा राज्य चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावला. म्हणजेच, पिता आणि पुत्र यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयात राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झालाय. अशा योगायोगाच्या गोष्टी जशा रंजक आहेत, तशाच त्या विजेत्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आहेत.
एक योगा योग असाही(Mahesh Kothare Sachin Pilgoankar)
बालकलाकाराला पुरस्कार या गोष्टीत आणखीन एक रंग. जेव्हा पहिल्यांदाच आपला मराठी चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला गेला होता तेव्हाची आठवण सांगायलाच हवी. संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास ‘ (२००३) या चित्रपटाची तशी निवड झाली रे झाली आणि मराठी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, माध्यम क्षेत्रात अबब… म्हणावी अशी प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. उर्जा निर्माण झाली.(Mahesh Kothare Sachin Pilgoankar)
‘श्वास ‘मधील बालकलाकार अश्विन चितळे याची तेव्हाची एक प्रतिक्रिया अगदीच वेगळी होती हो. वयानुसार माणसाच्या प्रतिक्रिया असतात अथवा हव्यात आणि हा अलिखित नियम कलाकारांनाही लागू होतोच की. तीही माणसेच. हाडामासाची, विविध भावभावनांची. चेहरा रंगवल्यावर ते कलाकार असतात. आणि कलाकार जेव्हा माणूस म्हणून वावरतो तेव्हा काही काही प्रतिक्रिया भाबड्या वाटल्या तरी त्या संयुक्तिक असतात. त्या त्या वयानुसार असतात. ऑस्करसाठी ‘श्वास ‘ पाठवला जाण्याच्या काही दिवस अगोदर या चित्रपटाला भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सुवर्ण पदकाचा मान प्राप्त झाला तेव्हाची गोष्ट.
नामांकन आणि पुरस्कार सोहळे..(Mahesh Kothare Sachin Pilgoankar)
आचार्य अत्रे यांच्या १९५४ सालच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटानंतर असे घडत होते हे विशेषच होते. ( ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या वेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे ते पहिलेच वर्ष होते हे आवर्जून सांगायलाच पाहिजे.) ‘श्वास ‘ असा दोनदा ( ऑस्कर आणि राष्ट्रपती पुरस्कार) वृत्तपत्राची हेडलाईन आणि न्यूज चॅनेलची ब्रेकिंग न्यूज होती. नेहमीप्रमाणेच अथवा सिस्टीमनुसार दोन्ही वेळा ( पण काही दिवसांच्या अंतराने) ही बातमी नवी दिल्लीवरुन दुपारी एका भव्य पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. आणि बघता बघता/ऐकता ऐकता/ सांगता सांगता सगळीकडे ती पोहचली. पण तेव्हा याच चित्रपटात महत्वाची भूमिका साकारलेल्या बालकलाकार अश्विन चितळे याची प्रतिक्रिया काय होती माहित्येय? तेव्हा तो शालेय वयात होता.
हे देखील वाचा = म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’
पिक्चरमध्ये त्याला पाहताना त्याचे शालेय वय लक्षात येतेच. त्याला ही सुवर्ण पदकाची बातमी समजली तेव्हा तो आपल्या घरीच होता आणि अशातच तो म्हणाला, आज सकाळीच ही बातमी जाहीर झाली असती तर ती मला माझ्या शाळेतील टीचरना पहिल्यांदा सांगता आली नसती का? मला भाव खात शाळेत फिरता आले असते…..गंमत म्हणजे, हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तुला काय वाटले? मिडियाच्या अशा हुकमी प्रश्नावर त्याने चक्क हेच उत्तर प्रामाणिकपणाने दिले. त्याचे हे बोल काही ठिकाणी चौकटीची गोष्ट ठरली. कारण पिक्चर हिट असल्याने तो स्टार होता आणि त्याच्या बोलण्याला वलय आले होते. कालांतराने आपल्या मुलाखतीत हीच गोष्ट तो रंगवून खुलवून आठवणीने सांगू लागला.(Mahesh Kothare Sachin Pilgoankar)
अर्थात, त्याची ती उत्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे त्याचे वयच तसे होते हे जसे खरे तसेच ‘श्वास ‘बद्दल ज्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यात ही वेगळीच आहे की नाही सांगा? अश्विन चितळेचा आनंद वाढावा अशी गोष्टही घडली. त्याला काही दिवसांतच याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्राप्त झाला. म्हणजेच त्याला एकाच भूमिकेसाठी आनंदीत होण्यास त्याला तीनदा संधी मिळाली.
बालकलाकारांसाठी आता चित्रपट, मालिका असे बरेच पुरस्कार आहेत. त्यात तीन नामांकनेही आहेत. म्हणजेच तीन बालकलाकारांत स्पर्धा , आणि रंगलेल्या इव्हेन्टसमध्ये एकाच्या नावाची घोषणा. म्हणजेच उर्वरित दोघांची समजून घालण्याची जबाबदारी त्याच्या पालक व दिग्दर्शकाची. बालकलाकाराच्या पुरस्काराचे फंडे अनेक. त्याची ही एक झलक.
दिलीप ठाकूर