Mahavatar First Look Poster : अभिनेता विकी कौशलने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. आजवर अनेक चित्रपटांमधून त्याने त्याचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. ‘उरी’, ‘संजू’, ‘मनमर्जियां’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘सॅम बहादूर’, ‘बॅड न्यूज’ यांसारख्या अनेक चित्रपटातून विकीने चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली आहे. नुकतंच त्याचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर लवकरच तो छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यानंतर आता विकी कौशलच्या आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचे नाव ‘महावतार’. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक पोस्टरदेखील समोर आला आहे. अभिनेत्याला या अवतारात याआधी कधीच पाहिले नसेल. या चित्रपटासाठी त्याने ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिनेश विजन यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हा चित्रपट दोन वर्षांनी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलला ‘स्त्री 2’ चे निर्माते दिनेश विजन यांनी एका मेगा प्रोजेक्टसाठी साइन केले आहे. दिनेश विजनच्या या चित्रपटात विकी कौशल भगवान परशुरामांची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरु होणार आहे. मॅडॉक आणि विकी कौशल या दोघांसाठी हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. चित्रपटाला फ्लोरवर जाण्यापूर्वी ६ ते ८ महिन्यांपेक्षा जास्त तयारीची आवश्यकता आहे त्यामुळे या चित्रपटाची सुरुवात २०२५ मध्ये केली जाईल. चित्रपटाविषयी माहिती देताना मॅडॉक फिल्म्सने ट्विट केले की, दिनेश विजन यांनी धर्माच्या चिरंतन योद्ध्याची कथा जिवंत केली आहे. हा चित्रपट अमर कौशिक दिग्दर्शित करत आहेत. विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत दिसणार आहे. २०२६ मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये येत आहे.
संजय लीला भन्साळी यांचा ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपट संपल्यानंतर विकी कौशल नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘महावतार’चे शूटिंग सुरु करणार असून जानेवारीमध्ये प्री-प्रॉडक्शनचे काम पूर्ण केले जाणार आहे. विकी अनेक मनोरंजक प्रकल्पांवर काम करत आहे. गेल्या वर्षी तो ‘सॅम बहादूर’मध्ये दिसला होता. यानंतर तो ‘बॅड न्यूज’मध्ये हलकीफुलकी कॉमेडी करताना दिसला. आता तो ‘छावा’मध्ये छत्रपती संभाजीच्या भूमिकेत दिसणार आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.