ॲमेझॉन प्राईमची लोकप्रिय वेबसीरिज ‘बंदिश बँडिट्स’ (Bandish Bandits) या सिरिजने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. नसिरुद्दिन शहा, ऋत्विक भौमिक, अतुल कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. घराणं जपण्यासाठी बंदिशीपासून स्पर्धेत अडकणारा काका पुतण्यातला सांगितिक संघर्ष दाखवणारी वेबसीरिज अनेक पैलू उलगडून प्रेक्षकांना खिळवून ठेवते. ‘बंदिश बँडिट्स’ या सीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. सीरिजला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. त्यानंतर या सीरिजचा दूसरा सीझन कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. प्राईम व्हिडीओने ‘बंदिश बँडिट्स’च्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. (Bandish Bandits Season 2)
या वेबसीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲमेझॉन प्राईमकडून (Amazon Prime) या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवाय ही सीरिज कधी येणार याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘बंदिश बँडिट्स’ या वेबसीरिजचा दुसरा सीझन येत्या डिसेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘बंदिश बँडिट्स’ या सीरिजमध्ये राधे व तमन्ना यांच्या संगीतात उजवा ठरलेला राधे भारतीय पारंपरिक संगीताचं प्रतिनिधीत्व करताना दिसला, तर तमन्ना सोशल मीडिया स्टार पॉप वेस्टर्न अंदाजात दिसली होती.
‘बंदिश बँडिट्स’च्या कथेसह या सिरिजमधील गाण्यांनीही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. वेबसीरिजच्या पहिल्या शॉटपासून सुरु होणारी धून असो की क्लासिकल वेस्टर्न फ्यूजन असो… या सीरिजचं प्रत्येक गाणं चाहत्यांच्या मनावर ठसलं आहे. या सीरिजमधील ‘सजन बिन’, ‘छेडखानिया’, ‘लब पर आये’, ‘विरह’ अशी सगळीच गाणी सोशल मीडियावर आजही जिवंत आहेत. अनेकजण या गाण्यांना आजही पसंती दर्शवतात.
त्यामुळे आता आगामी सीझनमधून प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार? राजस्थानच्या समृद्ध संस्कृतीला शोभणारा राजेशाही सांगितीक वारसा नक्की कोणाकडे जाणार? शास्त्रीय संगिताच्या कौटुंबिक कलहात काय नवे आव्हान येणार? हे ‘बंदिश बँडिट्स’च्या दुसऱ्या सीझनची सर्वांना उत्सुकता आहे. ‘बंदिश बँडिट्स’चा दुसरा सीझन केवळ प्राइम व्हिडिओवर भारतात आणि 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होईल.