‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे. बारामतीच्या छोट्याश्या गावातून आलेल्या सूरजने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षकांना आपलसं केलं. टिक टॉकवरील व्हिडीओंमुळे सूरज सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आला. आपल्या झापूक झूपूक अंदाजाने त्याने सर्वांना वेड लावलं होतं. सूरज गरिबीतूनवर आलेला असल्याने आणि अगदी निर्मळ मनाचा असल्याने महाराष्ट्रातील जनतेने त्यालाच पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता बनला. ‘बिग बॉस मराठी’चा शो जिंकल्यावर सूरज चव्हाणला १४.६ लाख रुपये मिळाले आहेत. (Suraj Chavan Mobile Gift)
याशिवाय ट्रॉफी आणि रोख रक्कमबरोबरच इलेक्ट्रिक स्कूटर आणि आकर्षक ज्वेलरीही त्याला मिळाली. याशिवाय केदार शिंदेंनी त्याला घेऊन एक नवीन चित्रपट करणार असल्याचेही जाहीर केलं होतं. अशातच आता महागडा मोबाइलही गिफ्ट म्हणून देण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये सूरजला महागडा मोबाईल भेट म्हणून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूरजला ‘राजा राणी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांकडून हे महागडं गिफ्ट देण्यात आलं आहे. ‘राजा राणी’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
‘राजा राणी’ चित्रपटाच्या दिग्दर्शक शिवाजी दोलताडे व गोवर्धन दोलताडे यांनी सूरजला अॅप्पल कंपनीचा महागडा मोबाइल दिला आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “सूरजला आमच्याकडून हे खास गिफ्ट देत आहोत. हे गिफ्ट त्याच्या आवडीचं आहे”. त्यानंतर सूरज गिफ्ट उघडत त्यातून महागडा मोबाइल काढतो. मग तो सर्वांना धन्यवाद देत असं म्हणतो की, “मनापासून मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. तुम्ही मला इतका पाठिंबा दिला. यामुळे मला खूप बरं वाटत आहे”. यांतर सूरज गिफ्ट उघडतो, तेव्हा अनेकजण त्याचे टाळ्या वाजवत कौतुक करतात. यानंतर सूरजला त्या मोबाईलचे नाव उच्चारताच येत नाहीत. नाव उच्चारतानाची त्याची झालेली फजिती पाहून सगळ्यांनाच हसू येतं.
दरम्यान, मीडिया इन्फ्ल्युएन्सर सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. आपल्या हटके डायलॉगमुळे प्रसिद्ध असणाऱ्या सूरजने बिग बॉसच्या घरात आपल्या स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि तो या पर्वाचा विजेता ठरला. सूरजला संपू्र्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सूरजची भूमिका असलेला ‘राजा राणी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.