‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. या कार्यक्रमाची क्रेझ फक्त महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण जगभरात पसरली आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘कोळीवाड्याची रेखा’ या नावाने घराघरांत लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. ‘हास्यजत्रे’मुळे वनिताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली. (Vanita Kharat Big Dream)
वनिताने आजवर स्वमेहनतीवर स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली. अभिनयाच्या जोरावर वनिताने हिंदी व मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना केवळ अभिनयाच्या जोरावर तिने आपलं स्थान पक्क केलं. हिंदीतील ‘कबीर सिंग’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तिने मराठी चित्रपटातही तिने लहान लहान भूमिका केल्या आहेत. अशातच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा या चित्रपटातही वनिताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला वनिता खरातने हजेरी लावली होती. यावेळी ‘इट्स मज्जा’सह बोलताना वनिताने तिच्या मोठ्या स्वप्नाबाबत खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, “मी अशी ठरवलेली भूमिका असं नाही आहे. आतापर्यंत मी विनोदी भूमिका बऱ्याच केल्या आहेत. आणि प्रेक्षकांनीही मला विनोदी भूमिकेत पाहिलं आहे. विनोदी अभिनेत्री म्हणून माझ्यावर प्रेम केलं आहे. मला ही विनोदी जॉनर खूप आवडतो. या जॉनरच्या भूमिकेत काम करायला आवडतं. पण मला प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात हे देखील दाखवयाचं आहे. माझ्यातील कलागुण माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत अशी माझी अपेक्षा आहे”.
यापुढे बोलताना वनिता म्हणाली, “आजवर मी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मुख्य भूमिकेत असं नाही लहान लहान भूमिका मी चित्रपटांमध्ये साकारल्या आहेत. ज्या दिवशी माझा, मी मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट मोठ्या पडद्यावर येईल त्या दिवसासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या आयुष्यातील तो आनंदाचा दिवस असणार आहे, आणि लवकरच तो दिवस येणार हे सुद्धा मला माहित आहे”.