कलाकारांच्या तगड्या विनोदी स्किट्सने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. तुफान विनोदी स्किट्स, कलाकारांचं अफलातून टायमिंग या सगळ्यामुळे या कार्यक्रमाची उंची वाढली आहे. विविध मुद्यांवर भाष्य करत ही कलाकार मंडळी अभिनय करत हे मुद्दे अतिशय योग्य पद्धतीने हाताळत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. गेली बरीच वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असून जगभरात या कार्यक्रमाचे चाहते आहेत. (Prithvik Pratap On Australia)
महाराष्ट्रातील तमाम जनतेला हसवून हा कार्यक्रम परदेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सदैव तत्पर असतो. काही दिवसांपूर्वीचं हास्यजत्रेतील कलाकार अमेरिका दौरा करून भारतात परतले. यावेळी अमेरिकेतल्या तमाम प्रेक्षकांना त्यांनी खळखळवून हसवलं. अमेरिकेतील प्रेक्षकांनीही ‘हास्यजत्रे’च्या या शोला भरभरून प्रतिसाद देत त्यांचं कौतुक केलं. या परदेश दौऱ्यादरम्यानचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून व्हायरलही झाले होते.
अशातच आणखी एका परदेश दौऱ्याची पोस्ट हास्यजत्रेतील एका कलाकाराने पोस्ट केली आहे. अभिनेता पृथ्वीक प्रतापने केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पृथ्वीकने पोस्ट शेअर करत ते लवकरच ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याचं सांगितलं आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ते ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याचं समोर आलं आहे. इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत पृथ्वीकने याबाबत सांगितलं आहे. यांत त्याने दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पृथ्वीकने पोस्ट शेअर करत ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्याने या पोस्टवर लिहिलं आहे की, “ऑस्ट्रेलियाने इथं येऊन आपल्याला हरवलं, आम्ही तिथं जाऊन त्यांची मनं जिंकणार” त्याच्या या कॅप्शनने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियायाने ६ गडी राखून भारताला पराभूत करत विजय मिळवला. त्यामुळे समस्त भारतीयांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. असं असलं तरी तमाम भारतीयांनी विजेत्यांचंही अभिनंदन केलेलं पाहायला मिळालं.
पृथ्वीकने शेअर केलेल्या या पोस्टवरून लवकरच ते ऑस्ट्रेलिया दौरा करणार असून ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर ते तेथील प्रेक्षकांना हसवायला सज्ज होणार आहेत.