अमोल कोल्हे यांनी आजवर त्यांच्या अभिनयशैलीने अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ऐतिहासिक चित्रपट, मालिका यांमधुन त्यांनी त्याच्या अभिनयाची विशेष छाप पाडली. अभिनयक्षेत्रात सक्रिय असणारे अमोल कोल्हे राजकीय क्षेत्रातही सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात ते कार्यरत असून निवडणूका जवळ आल्याने दौऱ्यावर जाण्यास त्यांनी सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे. (Amol Kolhe Troll)
अमोल कोल्हे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच अमोल कोल्हे यांनी एका दौऱ्यानिमित्त थेट लालपरीने प्रवास केल्याने ते चर्चेत आले आहेत. लालपरीने प्रवास करतानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते एसटीने प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांसह सेल्फी घेताना तसेच त्यांना सही देताना दिसत आहेत.
अमोल कोल्हे यांनी ही फॅन मुमेंट शेअर करत या व्हिडिओला कॅप्शन देत म्हटलं आहे की, “अनेक वर्षांनी आज लालपरीने प्रवास केला व लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. लालपरीने प्रवास केला नाही असा एक माणूस शोधून सापडणार नाही. ग्रामीण, दुर्गम भागाला शहरी भागाशी जोडणारी ही लालपरी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या रोजच्या जीवनात दळणवळणासाठी महत्वाची भूमिका बजावत असते. या प्रवासादरम्यान मायबाप जनतेशी, विद्यार्थ्यांशी, युवकांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला! या बसच्या वाहक या एक महिला भगिनी होत्या, ही माझ्यासाठी सुखावणारी बाब होती. या सर्वांसोबत प्रवास करून खूप छान वाटलं. या प्रवासातल्या आठवणी ग्रामस्थांसोबत सेल्फी काढून कैद केल्या”.
या व्हिडीओवरून अमोल कोल्हे ट्रोल झाले असल्याचं समोर आलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “अमोलदादा या पेक्षा मराठा आरक्षणासाठी लढा सुरु करा, इतिहासात नोंद होईल की हा माणूस लढला मराठा समाजासाठी”, तर आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “निवडणुका आल्यामुळे आता सगळे बाहेर येतील” असं म्हणत त्यांना सुनावलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने “दिखावा सूरू” असं म्हणत कमेंट केली आहे.