‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या शोचे चाहते आहेत. या शोचे प्रत्येक पात्र ही आता प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. विनोदाच्या परफेक्ट टायमिंगवर या शोमधील प्रत्येक कलाकाराने स्वतःची अशी जागा प्रेक्षकांच्या मनात तयार केली आहे. या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत पोहोचला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे पृथ्वीकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Prithvik Pratap Birthday)
स्वमेहनतीच्या जोरावर व सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना केवळ अभिनयाच्या जोरावर पृथ्वीकने सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आजवर या अभिनेत्याने अनेक स्वप्न पाहिलीत, यातील पृथ्वीकचं एक स्वप्न पूर्ण झाल्याचं काही दिवसांपूर्वीच त्याने सांगितलं होतं. ते म्हणजे मुंबईत स्वतःचं घर. पृथ्वीकने मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. ही आनंदाची बातमी त्याने चाहत्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. मात्र यापूर्वी पृथ्वीक भाड्याच्या घरात राहत होता. तब्बल तीस वर्ष त्याने भाड्याच्या घरात काढली आहेत. भाड्याच्या घरात राहत असताना तिथल्या भाड्याच्या रकमेबाबत त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.
‘संपूर्ण स्वराज्य’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीकने याबाबत भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना त्याने त्याला मिळणाऱ्या दरमहा पगाराबाबत भाष्य केले. “मला महिन्याला ६० हजार रुपये मिळतात. त्यात २० हजार रुपये घरभाडं, १० हजार रुपये एसआयपी, १० हजार रुपये इन्शुरन्स यात ४० हजार जातात. उरलेल्या पैशांत मी माझं आयुष्य जगतो. उरलेल्या २० हजार रुपयात मेडिकल, भाजीचा खर्च सगळं निघतं. बाकी गोष्टीत मला दादा-वहिनीची मदत होते” असं पृथ्वीक म्हणाला.
पृथ्वीकने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या पृथ्वीकने जिद्दीने स्वतःचं घर घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत तो म्हणाला होता की, “आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं” असं म्हणत त्याने त्याच्या नव्या घराबरोबरचा फोटोही शेअर केला होता.