‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी हास्यजत्रेच्या लाइव्ह शोजचं आयोजन केलं जातं. नुकतेच हे सगळे कलाकार त्यांच्या दुसऱ्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून हा शो ब्रेकवर होता. आता पुन्हा एकदा या शोचा नवा सीझन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. (maharashtrachi hasyajatra)
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या शोने कोरोना काळात प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं. त्यामुळे प्रेक्षकांनी या शोवर भरभरुन प्रेम केलं. त्यामुळे आता हा शो लवकरच रेकॉर्ड करणार आहे आणि याबद्दल शोच्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे. शोच्या नवीन सीझननिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मात्यांनी याबद्दल भाष्य केलं.
यावेळी अमित फाळके यांनी असं म्हटलं की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे हे साहजिकच आहे. त्यामुळे या टीमचं मला कौतुक करताना आनंद होत आहे. कारण, मी काही आकडे शेअर करत आहे, ज्यामागे या टीमची खूप मेहनत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे आतापर्यंत ८३७ ओरिजिनल भाग प्रसारित झाले आहेत. ८३७ ओरिजिनल भाग म्हणजे आता पर्यंत या शोमध्ये दोन हजार पाचशे स्किट्स झाले आहेत. दोन हजार पाचशे स्किट्स लेखकांच्या टीमने लिहणे आणि ते या कलाकरांनी सादर करणं या हळूहळू एका रेकॉर्डकडे जाणारा प्रवास आहे”.
यापुढे ते असं म्हणाले की, “आज मला हे सांगायला आनंद होत आहे की, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा प्रवास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल का? यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आम्ही लवकरच ही आनंदाची बातमी देऊ की, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे”. दरम्यान, तब्बल सहा वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अशातच आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन हा शो पुन्हा एका प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.