‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरे, वनिता खरात, नम्रता संभेराव यांसारख्या अनेक कलाकारांना स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली. यामधीलच एक कलाकार म्हणजे श्याम राजपूत. श्याम यांनी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं. पण त्यांच्या या स्वप्नांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने पंख दिले. पण त्यांचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. इंजिनिअरची डिग्री पूर्ण केल्यानंतर त्यांना अभिनयाचं वेड लागलं. पण त्यांनी हे वेड जोपासलं. यादरम्यानच्या काळात त्यांना कुटुंबियांची खंबीर साथ मिळाली. याचबाबत त्यांनी आता भाष्य केलं आहे.
‘इट्समज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ कार्यक्रमात श्याम यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान ते पहिल्यांदाच कुटुंबाविषयी व्यक्त झाले. याम यांनी हजेरी लावली होती. याव“आई-वडिलांनी तुम्हाला पहिल्यांदा टीव्हीवर पाहिलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?” असा प्रश्न श्याम राजपूत यांना विचारण्यात आला. तेव्हा श्याम म्हणाले, “कितीतरी वर्ष मी माझ्या आईच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी टेन्शन पाहिलं आहे. इंजिनिअर झाल्यानंतर आपला पोरगा काहीतरी करेल असं तिला वाटलं होतं”.
“नाटकाचे संवाद मी रस्त्यावर चालताना बोलत असायचो. तेव्हा तिला तिची मैत्रीण म्हणाली होती की, तुमचा मुलगा जरा मला वेडा झाल्यासारखा वाटतो. रस्त्याने तो बडबड करत चालला होता. किंवा काही लोकांनी असंही म्हटलं की, नका त्याच्या नादाला लागू. त्याचं काही खरं नाही. त्यांचं आयुष्यही उद्धवस्त होईल. या सगळ्यामधून मी जेव्हा टीव्हीवर तिला दिसतो तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये समाधान मला दिसलं”. आईबद्दल बोलताना श्याम यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी कुटुंबाविषयी भरभरुन सांगितलं.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेच्या हातावर रंगली सिद्धार्थ बोडकेच्या नावाची मेहंदी, नवरीबाईचा उत्साह, जय्यत तयारी अन्…
श्याम अजूनही एकत्र कुटुंबामध्ये राहतात. ते म्हणाले, “मी माझ्या कुटुंबियांच्या डोळ्यांमध्ये प्रेमाबरोबरच माझ्याविषयीची काळजीही पाहिली. ही काळजी मी सतत माझ्या भाऊ, आई, बायकोच्या डोळ्यांमध्ये पाहिली आहे. त्या काळजीचं रुपांतर मी थोडं थोडं अभिमानामध्ये होताना मी पाहिलं आहे. तेव्हा मला बरं वाटलं. हा एक कमाल अनुभव आहे. जबाबदारीही आहे पण छान वाटतं”. आई-पत्नीसह श्याम यांना त्यांच्या भावाचीही खंबीर साथ मिळाली.