बरेच असे कलाकार आहेत जे त्यांचं नशीब अजमवण्यासाठी मुंबईत येतात. मुंबईत येऊन स्वतःचं करिअर करणं, राहण्याची सोय नसतानाही वाटेल ते काम करुन एखादा निवारा शोधणं. आणि स्ट्रगल सुरु असताना मुंबईत घर घेणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. बरं, हे स्वप्न अनेक कलाकारांनी पूर्ण केलेलंही पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या कलाकाराचं घर घेण्याचं स्वप्न काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं. हा अभिनेता म्हणजे सगळ्यांचा लाडका सावत्या, म्हणजेच अभिनेता रोहित माने. (Rohit Mane Wife Post)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून रोहित माने घराघरांत पोहोचला. या कार्यक्रमामुळे रोहितला सावत्या म्हणून लोकप्रियता मिळाली. इतकंच नव्हे तर रोहित चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होतं आहे. या प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराने काही दिवसांपूर्वीच घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. त्यानंतर आता रोहितने त्याच्या बायकोसह त्याच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. दोघांचा एकत्र फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे.
रोहितच्या बायकोने याबाबतची एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. नव्या घरातील पहिलाच एकत्र फोटो शेअर करत तिने म्हटलं आहे की, “घर हा शब्द खुप छोटा आहे पण त्याच वजन खूप मोठं आहे. या घराच स्वप्न आपण एकत्र पाहिलं आणि ते एकत्र पूर्ण केलं. आज स्वत:च्य घरात फोटो काढताना फारच कमाल वाटत होतं. मम्मी, पप्पा तुमचे आभार. तुम्ही मला स्वप्न बघायला शिकवली आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच पाठीशी उभे राहिलात”.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ‘साताऱ्याचा विनोदी तारा’, ‘देशी हॉटनेस’ अशा अनेक बिरुदांनी लोकप्रिय असलेल्या रोहित मानेने त्याच्या नवीन घराची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत घराची झलकही दाखवली होती. या पोस्टखाली त्याने असे म्हटले होतं की, “मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून राहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळया प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल”.