घराघरातील रसिकांच्या डोक्यावरील टेन्शन कमी करणारा व मनसोक्त हसवणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. विनोदी स्कीट्स व कलाकारांचे अफलातून टायमिंगमुळे हा कार्यक्रम अनेकांच्या घरी आवर्जून बघितला जातो. यामुळेच कार्यक्रमातील अनेक कलाकारांना आज जगभरात ओळखतात. याच कार्यक्रमात एक अवली कलाकार जो त्याच्या अफाट विनोदी अंदाजासाठी ओळखला जातो, तो म्हणजे फिल्टरपाड्याचा बच्चन अभिनेता गौरव मोरे. (Gaurav More)
पवईच्या फिल्टरपाडा येथे आलेल्या गौरव मोरेने एका रिॲलिटी शोमधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तो अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये झळकला आहे. पण हास्यजत्रेमुळे गौरवची लोकप्रियता वाढली, आणि त्याच्या पवई फिल्टरपाड्याला वेगळी ओळख मिळाली. सध्या गौरवकडे अनेक चित्रपटांचे प्रोजेक्ट्स असून तो लवकरच ‘अंकुश’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, गौरवचा फिल्टरपाडा कसा आहे आणि त्याच्यामुळे त्या भागाची ओळख कशी झाली, हे त्याने ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. (Gaurav More Povai Filterpada)
गौरवने त्याच्या फिल्टरपाड्याची ओळख करून देताना म्हणाला, “मुंबईच्या पवई येथे आरे कॉलनी परिसरात हा फिल्टरपाडा आहे. परिसराच्या बाजूला पवई तलाव व विहार लेक आहे. तर शाळेत असताना आम्ही सर्व मुंबईचा नकाशा बघायचो. तेव्हा आम्हाला विहार लेक, तुळशी तलाव सगळं दिसायचं, पण फिल्टरपाडा दिसत नव्हता. जिथं मी राहतोय तो फिल्टरपाडा दिसत नाही, असा मी नेहमीच विचार करत आलो. कारण आपण ज्या ठिकाणी राहिलो, वाढलो त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. याचमुळे मला जेव्हा हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मला माझ्या स्कीटची सुरुवात “आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा….” अशी करायला सांगितली. यानिमित्ताने किमान आपल्या भागाचं नाव दिसतंय, याचा मला आनंद झाला होता. त्यामुळे ही ओळख मिळण्यामागे सचिन गोस्वामी यांचं श्रेय आहे.”
हे देखील वाचा – “भेगांमधून रक्त, चालताना त्रास अन्…”, वर्षभरापूर्वी निधन झालेल्या मावशीविषयी बोलताना अमृता खानविलकरला रडू कोसळलं, म्हणाली, “आजारपण…”
पुढे तो त्याच्या भागातील लोकांचे अनुभव सांगताना म्हणाला, “अनेक जण मला येऊन सांगतात, की जेव्हा ते नोकरीवरून रिक्षाने फिल्टरपाड्यात येतात. अन् त्यातील बरेचसे रिक्षाचालक हा गौरव मोरेचा एरिया आहे असं म्हणता. असाच एक किस्सा आहे, जेव्हा माझे काही मित्र नाक्यावर उभी होती, तेव्हा तिथे एक बस आली. त्या बसवर माझी भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा पोस्टर लागलेला होता. तेव्हा त्या मित्रांनी त्या पोस्टरचे फोटो काढून मला पाठवले, आणि म्हणाले की तुझा फोटो पाहून आम्हाला बरं वाटलं.”
हे देखील वाचा – ‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, केतकी माटेगावकरच्या लूकने वेधलं लक्ष
आज तिथल्या लोकांना खूप भारी वाटतं, की आपल्या फिल्टरपाड्याला आज गौरवचं नाव लागलेलं आहे. त्यांना अभिमान वाटतो, की आपल्या भागातील मुलगा आज महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर दिसत असून त्याच्यामुळे फिल्टरपाड्याची ओळख झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवने सांगितलं.