‘लंडन मिसळ’ हा मराठमोळा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या हटके कथेमुळे चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चा होती. या चित्रपटातून भरत जाधव एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तर ऋतुजा बागवे, गौरव मोरे, रितीका क्षोत्री, माधुरी पवार, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कालपासून (८ डिसेंबर) हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कलाकार सर्वत्र भेटी देत आहेत. अशातच अभिनेत्री रितीका व ऋतुजा प्रमोशनसाठी रेड एफ.एम.च्या आर.जे.ला मुलाखत दिली. या मुलाखतीत रितिकाने सहअभिनेत्री ऋतुजाचे कौतुक केले आहे. (Rutuja Bagwe On Instagram)
यावेळी आर.जे.कडून रितीकाला “बहीण म्हणून ऋतुजाची वैयक्तिक व चित्रपटातील तिच्या पात्राची एक चांगली सवय कोणती?” असा प्रश्न विचारण्यात येतो. यावर “हा खूप चांगला प्रश्न आहे” म्हणत ती असे उत्तर देते की, “लंडन मिसळ चित्रपटाच्या एडिटनंतर चित्रपट खूप मोठा झाला होता. त्यामुळे दिग्दर्शकाने आम्हाला चित्रपट बघायला बोलावलं होतं. तेव्हा आम्हालासुद्धा चित्रपट खूप मोठा वाटला. त्यामुळे आम्ही दिग्दर्शकांना चित्रपटातले काही सीन्स एडिट करायला सांगितले. यावर दिग्दर्शकांनी ऋतुजाला फोन करुन एडिटबद्दल सांगितले. तेव्हा ऋतुजाने दिग्दर्शकांना माझ्या काही सीन्सचे या चित्रपटात फारसे योगदान नाही. त्यामुळे माझे काही सीन्स काढून टाकलेत तरी चालेल. पण तुम्ही रितीकाचे सीन न काढता ते तसेच ठेवायला सांगितले. यामुळे ही खरच माझी मोठी बहीण असल्यासारखे मला वाटले.”
यापुढे ती असं म्हणाली की, “ऋतुजाचा हा नि:स्वार्थीपणा मला खुपच आवडला. तिचा हा निर्णय माझ्यासाठी चांगला होताच, पण चित्रपटाच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा निर्णय होता. तिने याआधी अनेक सुंदर कामे केली आहेत. अनेक चित्रपट व मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण नायिका म्हणून तिचा हा पहिला चित्रपट असूनदेखील तिने घेतलेला हा निर्णय खरंच खूप मोठी गोष्ट आहे.” यापुढे रितीकाने चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दलची एक चांगली गोष्ट सांगताना असे म्हटले की, “जेव्हा आम्ही दोघी एखादा भावनिक सीन शूट करायचो तेव्हा ती एका दमात तो सीन करायची आणि त्यानंतर मला काही गोष्टी सुचवायची. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदाच विनोदी भूमिका करत असल्यामुळे ती चांगलं काम करण्यासाठी कायमच तत्पर असायची. त्यामुळे कामाबद्दल असलेली आवड, निष्ठा व समर्पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत”
दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळट आहे. या चित्रपटात लंडनमध्ये मिसळचं हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन बहिणींची कथा बघायला मिळणार आहे आणि या दोन बहिणींच्या भूमिकेत ऋतुजा व रितीका आहेत. भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायले आहे. तसेच ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित असल्याचेही म्हणण्यात येत आहे. या चित्रपटाची कथा जालिंदर कुंभार यांनी लिहिली आहे, तर पटकथा व संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै व आरोन बसनेट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे,