छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘कुंडली भाग्य’ आणि मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंजुम फकीह. आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अंजुमने नुकतेच बॉयफ्रेंड रोहित जाधवबरोबर ब्रेकअप केले असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघे रिलेशनमध्ये होते. पण आता त्यांच्यात काही कारणास्तव बिनसले असल्याची चर्चा सुरु आहे.
अंजुम-रोहित यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अंजुम फकीहने अद्याप तिच्या ब्रेकअपबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने त्यांच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु हे दोघे नुकतेच एका सहलीला गेले होते. तिथे काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि या भांडणामुळे हे दोघे वेगळे झाले असल्याचे म्हटले जात आहे.
या सहलीदरम्यान, त्यांच्यात नेमके असे काय घडले? की या दोघांचे ब्रेकअप झाले. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याशिवाय अंजुम व रोहितने सोशल मीडियावरही एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती मिळत आहे. तसेच, ‘कुंडली भाग्य’ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून रोहितसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत.
दरम्यान, अंजुमने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती व तिचा प्रियकर रोहित हे दोघे कोविडच्या काळात एकमेकांना भेटले होते. जेव्हा ती गोव्यात ‘कुंडली भाग्य’च्या टीमसह शूटिंगसाठी गेली होती. त्यादरम्यान, ती रोहितशी मेसेज व व्हिडिओ कॉलद्वारे बोलायची. त्यावेळी रोहितने अचानक गोव्यात येऊन तिला आश्चर्यचकित केले होते. या काळात दोघांनी गोव्यात एकत्र ईदही साजरी केली होती. याच भेटीत अंजुमने रोहितला तिचे त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते आणि तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्यांच्यात काही कारणावरून ब्रेकअप झाले आहे आणि त्यांच्या या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.