अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर ही सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडींपैकी एक जोडी आहे. या जोडीने आजवर अनेक चित्रपटातील अभिनयांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या दोन्ही कलाकारांपाठोपाठ आता त्यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकरदेखील सिनेसृष्टीत पाऊल टाकत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘मिर्झापूर’ वेबसीरिजमुळे अभिनेत्री श्रिया पिळगावकर घराघरांत लोकप्रिय झाली. श्रियाने नुकतीच ‘व्हायफळ’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. (Shriya Pilgaonkar Shares Childhood Incident)
यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “लोक मला विचारतात तुला मराठी वाचता येत का?”, याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. श्रिया म्हणाली, “काही जणांना असं वाटतं मला मराठी वाचता येत नाही. पण, असं नाही आहे. मला मराठी वाचता येतं. माझ्या काही महाराष्ट्रीयन मित्रमंडळी आहेत त्यांना मराठी वाचता येत नाही. मी पाचवीपर्यंत ICSE बोर्डात होते. माझ्या त्या शाळेत पाचवीनंतरच्या अभ्यासक्रमात मराठी विषय ठेवणार नव्हते. ही गोष्ट समल्यावर आईने माझी शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. माझी शाळा बदलून तिने मला SSC बोर्डात घातलं. जेणेकरून मला मराठी या विषयाचं व्यवस्थित शिक्षण मिळेल”.
श्रिया पुढे म्हणाली, “शाळेमुळे मला मराठी उत्तम वाचता आणि लिहिता येतं. पण मला मराठी पुस्तक वाचण्याची फारशी सवय नाही. पण, मला कोणी मराठी पुस्तक दिलं, तर मी नक्की वाचते. आई मला लहानपणी लहान-लहान मराठी गोष्टींचे पुस्तक वाचायला द्यायची. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे वा बरोबरचा मित्रपरिवार हा महाराष्ट्रीयन नसल्याने मराठी विषयी खास काही बोललं जातं नाही. त्याबद्दल संभाषण केलं जातं नाही.
श्रियाने तिच्या आजोबांची आठवण काढत असेही म्हटलं आहे की, “माझे आजोबा मला पु.ल.देशपांडेंच्या गोष्टी सांगायचे. मला त्यांची पुस्तक वाचायला सांगायचे. मी मराठी पुस्तक उत्तमप्रकारे वाचू शकते. पण, सध्या कामामुळे माझं फारसं वाचन होत नाही. शूटिंग करताना स्क्रिप्ट सुद्धा मी मूळ देवनागरी भाषेत वाचते. तेच मला जास्त सोयीस्कर वाटतं” असंही ती म्हणाली.