Ankita Walawalkar on Air India : एअर इंडियाच्या विमान अपघाताने सारं जग हादरलं. अहमदाबाद येथून लंडन येथे जाणार एअर इंडियाचे बोईंग ८८७ ड्रीमलायनार एआय १७१ हे विमान उड्डाण घेताच काही क्षणातच खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या विमान अपघातात संपूर्ण देश हळहळला. या विमानातील २४१ प्रवासी आणि विमान चालक व इतर कर्मचारी यांचा मृत्यू झाला. सर्वच स्तरातून या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकार मंडळींनीही या घटनेनंतर आपल्या भावना स्टोरी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या. तर या विमान अपघातानंतर अनेकांनी विमानसेवेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनेही या घटनेनंतर विमानसेवेवर बोट ठेवलं आहे.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकणहार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर ही नवऱ्यासह युरोप दौऱ्यावर गेली होती. युरोप प्रवासाचे अनेक फोटो, व्हिडीओ तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. सोशल मीडियावर अंकिता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच अंकिताने अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विमानसेवेला दोष दिला. युरोपला जाताना अंकिता व कुणाल एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करत होते. यावेळी विमानाची आतली परिस्थिती पाहून त्याचा व्हिडीओ तिने बनवला.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अंकिताने संधी साधत हा विमान प्रवासाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विमानातील स्क्रीन्स नीट न चालण्यावरुन, एसी नीट सुरु नसल्यावरुन आणि जेवणावरुन भाष्य करताना दिसत आहे. नऊ तासांच्या या युरोप प्रवासात अंकिताला आलेल्या वाईट अनुभवाचा थेट तिने व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि याला जबाबदार कोण असा सवाल केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “अलीकडेच मी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला”.
पुढे ती म्हणतेय, “एसी व्यवस्थित काम करत नव्हता, याशिवाय स्क्रीन्सची अवस्था सुद्धा अतिशय वाईट होती आणि जेवणाबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. ९ तासांचा विमानप्रवास आम्ही या परिस्थितीत केला आहे. विमानांची अशाप्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचा जीव धोक्यात का घालत आहेत?” असा सवाल ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताने तिच्या पोस्टमध्ये केला आहे.





