आलिया भट्ट ही सध्या लोकप्रिय व आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर आलियाने बऱ्याच हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रायांच्यासह करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र सुरुवातीला वरुण व सिद्धार्थ आलियाला चित्रपटात घेण्याच्या विरोधात होते? आलियाला चित्रपटात घ्यावे असे दोघांनाही वाटत नव्हते. याचा खुलासा दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण ८’ या शोमध्ये केला आहे. (Karan Johar Reveals Varun Dhawan Sidharth Malhotra Truth)
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा पाहुणे म्हणून आले होते. यावेळी त्यांनी खूप धमाल, गप्पा केल्या. करण जोहरने यावेळी आलियाबद्दल मोठा खुलासा केला. करण जोहरने यावेळी एक मोठा खुलासा करत सांगितलं की, “वरुण व सिद्धार्थ ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये आलियाच्या जागी कास्ट करण्यासाठी इतर कलाकारांचे फोटो पाठवत असत”. सिद्धार्थ मल्होत्रा व वरुण धवन यांना करण असा काही खुलासा करेल याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे असं बोलताच दोघांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. करणने सांगितले की, “आलिया, वरुण, सिद्धार्थमध्ये आता चांगले नाते असले तरी सुरुवातीला दोन्ही कलाकारांना आलियाने चित्रपटात यावे असे वाटत नव्हते”.
करण जोहरने आलियाबाबत जेव्हा खुलासा केला तेव्हा वरुण व सिद्धार्थ पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. करण म्हणाला, “मला अजूनही आठवत आहे की, आलिया जेव्हा पहिल्यांदा आली होती, तेव्हा तुम्ही तिला कास्ट करू शकत नाही असे सांगून मला मॅसेज केले होते. तुमच्यापैकी एकाने ती खूप लहान असल्याचेही म्हटलं होतं’. सुरुवातीला हे झाल्यानंतर तीन महिन्यांनी जेव्हा मी आलियाबरोबर फोटोशूट केले तेव्हा ती शांत उभी होती”.
करण जोहर पुढे म्हणाला, “तिने तुमच्या दोघांकडेही पाहिले नाही. एकतर ती लाजाळू होती वा ती घाबरत होती. कारण तुम्ही सर्व मला आधीपासून ओळखत होता, पण तिची माझी अशी ओळख नव्हती” असं म्हणत करणने आलियाची या चित्रपटात कशी एंट्री झाली याबाबत सांगितलं.