ओरी उर्फ ओरहान अवतारमणी बी-टाऊनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अनेकदा तो स्टार किड्सबरोबर पार्टी करताना दिसला असून त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. ओरी बॉलीवूडच्या मोठमोठ्या सोहळ्यांमध्येही दिसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘ओरी काय करतो?’ असा ट्रेंड सुरू आहे. यानंतर आता ओरीबाबत खूप मोठी बातमी समोर आली आहे. ओरी लवकरच सलमान खानच्या ‘बिग बॉस १७’मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांवर आता ओरीने मौन सोडलं आहे. (Orry On Bigg Boss 17)
इटाइम्सच्या अहवालानुसार, ओरी लवकरच ‘बिग बॉस १७’च्या घरात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घेतलेली एन्ट्री ‘बिग बॉस’च्या घरात शेवट्पर्यंत टिकून राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या, रिपोर्टनुसार, ओरी ‘बिग बॉस १७’च्या मंचावर सलमान खानबरोबर ‘विकेंड का वार’मध्ये दिसणार आहे.
अशातच आता ओरीने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. काल रात्री ओरी मुंबईत सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीच्या ‘फरे’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान दिसला होता. यावेळी ओरी रेड कार्पेटवर पोज देत असताना त्याला विचारले की, “‘बिग बॉस १७’ च्या घरात तो प्रवेश करणार आहे का? ओरीने या प्रश्नावर सुरुवातीला स्मितहास्य केले आणि नंतर गमतीने पापाराझींना विचारलं, “कोणता बॉस…?”.
ओरी हा बॉलिवूड कलाकार नाही किंवा स्टार किडदेखील नाही, पण अंबानींपासून ते कपूर, खान कुटुंबापर्यंत तो अनेक सेलिब्रिटींचा खास आहे. अनेक स्टार किड्स व बीटाऊन कलाकार ओरीला मित्र मानतात. ओरीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी त्याच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. ओरी स्वत:ला गायक, साँग रायटर, क्रिएटिव्ह डारेक्टर, फॅशन स्टायलिस्ट असल्याचं सांगतो.