प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ हिंदी टीव्हीमधील सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या शोजपैकी एक आहे. या शोमध्ये आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये अनेक गंमतीजमती होतात, शिवाय या शोमधील कलाकारांची वक्तव्येही अनेकदा चर्चेत आलेली आहेत. या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली आहे. (Koffee With Karan New Promo)
अशातच या शोमध्ये आगामी भागात कपूर सिस्टर्स हजेरी लावणार आहेत. जान्हवी व खुशी कपूर या बहिणी करण जोहरच्या शोच्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार असून यावेळी जान्हवीने शिखर पहाडियाबरोबरच्या तिच्या नात्याचे काही संकेतही दिले आहेत. यावेळी रॅपिड फायर या राऊंडदरम्यान, जान्हवीला तिच्या स्पीड डायलवरील तीन व्यक्तींच्या नंबरबद्दल विचारले असता, यावर जान्हवी प्रथम तिचे वडील बोनी कपूर यांचे नाव घेते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ती खुशू म्हणजेच खुशी असल्याचे सांगते आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ती नकळत तिच्या कथित प्रियकर शिखूचे (शिखर पहाडियाचे) नाव घेताना दिसते.
शिखर पहाडीया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहेत. जान्हवी व शिखर हे अनेकदा रेस्टॉरंट्स, पब, पार्ट्यांमध्ये स्पॉट झाले आहेत. मात्र त्यांनी अद्याप त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कुठेही सांगितलेले नाही. यावेळी ‘कॉफी विथ करण’च्या या भागात दोन्ही कपूर सिस्टर्सनी त्यांच्या खास स्टायलिश लुकमध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी जान्हवीने लाल रंगाचा मोठा गाऊन परिधान केला आहे तर तिची बहीण खुशीने पिवळ्या रंगाचा वन-पीस परिधान केला आहे. या लुकमध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र या प्रोमोचीच चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आगामी काळात तिचा ‘एन.टी.आर.३०’ व ‘बडे मिया छोटे मिया’ हे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच ती वरुन धवनबरोबरच्या ‘बवाल’ या चित्रपटात दिसली होती. तर खुशीने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यामध्ये ती सुहाना खान व अगस्त्य नंदा यांच्यासह मुख्य भूमिकेत होती.