‘सारेगमप लिट्ल चॅम्पस’ची विजेती व लाईव्ह गाण्याचे शो करणारी कार्तिकी गायकवाडच्या आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला नुकतीच सुरुवात झाली आहे. गायिका लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर ओटीभरणाचे खास कार्यक्रम शेअर करत तिने आई होणार असल्याची खुशखबर चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे लवकरच कार्तिकी गायकवाडच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामुळे तिच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच यात आणखी एका आनंदी बातमीची भर पडली आहे. कार्तिकीच्या वडिलांना नुकताच एक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कारासंबधी एक खास पोस्ट कार्तिकीने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या वडिलांचे खास फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोसह तिने असं म्हटलं आहे की, “१ एप्रिल २०२४ रोजी पंडीत कल्याणजी गायकवाड यांना श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. आयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंद गिरीजी यांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कल्याणजी गायकवाड यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे साक्षात श्री संत एकनाथ महाराजांचा आशीर्वादच आहे.” कार्तिकीने वडिलांना पुरस्कार मिळाल्याच्या आनंद या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. कार्तिकीला बालपणापासून गाण्याची आवड होती. घरातूनच तिला गाण्याचं बाळकडू मिळालं आहे आणि हे बाळकडू तिला तिच्या वाडिलांकडूनच मिळाले आहे. कार्तिकीचे वडील पंडित कल्याणजी गायकवाड हे गायक व संगीतकार आहेत आणि त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान, कार्तिकी नुकतीच तिच्या आई होणार असल्याच्या खुशखबरमुळे चर्चेत आली होती. अशातच आता तिच्या वडिलांना हा पुरस्कार मिळाला असल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे गायिकेवर व तिच्या वाडिलांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.