मुक्या प्राण्यांवर अत्याचार होत असलेले पाहणे कोणालाच आवडत नाही. मुक्या प्राण्यांना नाहक त्रास देऊन त्यांची मज्जा घेणे ही विकृती गेले काही दिवस वाढली आहे. यावर अनेकदा अनेकांनी आवाजही उठवला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर नुकतेच एका आयपीएल सामन्यादरम्यान कुत्र्याला देण्यात आलेल्या अमानुष वागणुकीवर बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी अवजा उठवला होता. अशातच आता आणखी एका पाळीव कुत्र्याबद्दल अभिनेते भाऊ कदम यांच्या मुलीने आवाज उठवला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या शो च्या माध्यमातून भाऊ कदम हे घराघरांत पोहोचले आहेत. या शोमुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली असून त्यांचा चाहतावर्गदेखील बराच मोठा आहे. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयीहीदेखील चांगलीच चर्चेत राहत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका पोस्टने तिने सर्वांचेलक्ष वेधून घेतले आहे. मृण्मयी ही प्रचंड प्राणी प्रेमी आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ती बरेचदा प्राण्यांना लागणाऱ्या मदतीचे आवाहन तसेच प्राण्यांसाठीच्या पोस्ट शेअर करत असते. अशातच तिने नुकतेच एका पाळीव कुत्र्याबद्दल मदतीचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा – आज ‘या’ राशीच्या लोकांना करिअर व व्यवसायात यश मिळू शकते, जाणून घ्या तुमचे आजच्या दिवसाचे राशी भविष्य
मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “समोरच्याला ‘एप्रिल फूल’ बनवून मजा घेणं ही आता विकृत सवय झाली आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरातल्या स्टफीसाठी ४ एप्रिलचा ‘World Stray Animals Day’ हाच खरा ‘एप्रिल फूल’चा दिवस ठरणार आहे. कुठल्यातरी नशेत काही माणसं या स्टफीला कसंही मारतात, त्याच्या अंगावर पाय देतात, शेपटीला इजा करतात आणि आता ‘हा कुत्रा चावतो’ अशी तक्रार गेल्यामुळे BMC ने त्याला उचलून नेलं आहे”.
यापुढे तिने “असं अचानक पकडून नेलेल्या निराधार, मुक्या स्टफीची रोजची फरफट आमच्या डोळ्यासमोर सुरु आहे. त्याला परत आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण यात आम्हाला तुमचीसुद्धा मदत हवी आहे. ‘World Stray Animals Day’च्या आधी लवकरात लवकर जर याबद्दल आवाज नाही उठवला तर आम्ही त्याला कायमचं गमावून बसू. स्टफीला बोलता येत नाही, त्याचं म्हणणं आपण पोहोचवलंच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने हे शेअर करा. आपल्याला त्याला वाचवायचं आहे” असं म्हणत त्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.