सध्या करमणुकीसाठी इन्स्टाग्रामवरील रील्स व्हिडीओ पाहण्याकडे सर्वांचाच कल वाढला आहे. लॉकडाउनच्या नंतर सोशल मीडिया वापरण्यावर अधिक भर दिलं गेला आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया वापरण्याचे जणू व्यसनचं लागलं आहे. यात लहान मुलांपासून ते तरुण, वयोवृद्धदेखील रील्स पाहण्यात व्यस्त आहेत. झोपताना-जागताना, खात-पिण्यात, प्रवासात, सगळीकडे रिल्सचा हँगओव्हर दिसून येतो. त्यामुळे मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळीदेखील रील्स व्हिडीओद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
मराठी मनोरंजन सृष्टीतील असे अनेक कलाकार मंडळी आहेत, जी सोशल मीडियावर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. अशा अनेक कलाकारांपैकी एव्हरग्रीन कलाकार म्हणजे अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. अविनाश व ऐश्वर्या नारकर हे दोघे त्यांच्या अभिनयाबरोबरच अनेक मजेशीर व डान्स रील्स व्हिडीओमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या याच रील्स व्हिडीओ बनवण्यामागच्या विचाराबद्दल ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले आहे.
नुकतंच ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात ऐश्वर्या नारकर यांनी असं म्हटलं की, “बऱ्याचदा आम्ही एखाद्या गाण्याच्या मुख्य स्टेप्स असतात त्या आम्ही फॉलो करतो. पण मला फार नाचता येत नाही पण अविनाश बऱ्यापैकी चांगला डान्स करतात. त्यामुळे एखादी डान्स स्टेप करताना ती मला काशी सहज करता येईल त्यादृष्टीने आम्ही तो डान्स बसवतो आणि काहीवेळा आम्ही एखादं कंटेन्ट स्वत: बनवतो. नवरा-बायकोचे संबंध, नवरा-बायकोचे नाते, नवरा-बायकोची मैत्री ही कशी असायला पाहिजे यादृष्टीने मी काही वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या होत्या.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आमच्या लग्नाला आता जवळपास तीस वर्षे पूर्ण होतील. तर त्या नात्यातला आनंद कसा टिकवता येईल? यादृष्टीने मी बऱ्याचदा पोस्ट शेअर करते. मला असं वाटतं की, आपल्याला सगळ्या बाजूने सोशल मीडियाचा वापर करता आला पाहिजे. फक्त मनोरंजन किंवा टाईमपास करण्यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्याबाबतीत लोकांपर्यंत काय पोहोचवता येईल यादृष्टीने आम्ही सोशल मीडियावर कंटेन्ट बनवत असतो”.