कार्तिकी गायकवाड सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. ही लोकप्रिय गायिका लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज तिने चाहत्यांशी शेअर केली आहे. कार्तिकीने आई होणार असल्याची आनंदाची बातमी देताच तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे. कार्तिकीने २०२० साली रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. लग्नाला चार वर्ष पूर्ण होताच आता कार्तिकी व रोनित आई-बाबा होणार आहेत. नुकताच कार्तिकीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला. (Kartiki Gaikwad Mom To Be)
कार्तिकीच्या राजेशाही थाटमाट असलेल्या डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले. अशातच कार्तिकीच्या डोहाळ जेवणादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ‘समर्था खेसे’ या युट्यूब चॅनलवर कार्तिकीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकी तिच्या आई होण्याबद्दलचा आनंद थोडक्यात व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी बोलताना कार्तिकी म्हणाली, “आज माझा ओटीभरण्याचा कार्यक्रम आहे. आजच्या खूप वेगळ्या भावना आहेत. कारण आतापर्यंत आयुष्यामध्ये अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. अगदी बालपणापासून ते संगीत क्षेत्रामधील आवड. बाबा स्वतः माझे गुरु असल्यामुळे लहानपणापासून गाण्याची आवड आणि त्याच क्षेत्रामध्ये वाटचाल. म्हणजे अगदी बाबांबरोबर कार्यक्रमाला जाण्यापासून ते ‘सारेगमप’चं पर्व”.
पुढे कार्तिकी म्हणाली, “एक लहान कार्तिकी महाराष्ट्रातील, जगभरातील रसिक प्रेक्षकांसमोर आली. आपण उदंड आशीर्वाद, प्रेम दिलं. त्यानंतर कधीच अशी कल्पनाही केली नव्हती. लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींचा मी कधीच विचार केला नव्हता. पण २०२०मध्ये माझं रोनित पिसे यांच्याशी लग्न झालं आणि त्यानंतर आता एका नव्या वेगळ्या भूमिकेत म्हणजे आईच्या भूमिकेत जातेय. ही खूप वेगळी भावना आहे. एक जबाबदारी वाटतेय. त्याचबरोबर आनंदीही खूप सारा आहे”.
कार्तिकी पुढे असंही म्हणाली की, “असं म्हणतात की, स्त्रीचा हा दुसरा जन्म असतो. तर अगदी खरं तसंच होणार आहे मला वाटतंय. जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा आईच महत्त्व अधिक कळतं. त्यामुळे ही एक वेगळी भूमिका असणार आहे. आणि मी माऊली चरणी, देवा चरणी हीच प्रार्थना करेन की, बाळाला त्यांनी खूप सुखी, समाधानी आयुष्य द्यावं आणि बाळाचं आरोग्य उत्तम राहो. बाळाच्या येण्याने आमच्या परिवारात प्रचंड आनंद झालेला आहे. बाळ आल्यानंतर तो आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद असेच आमच्या परिवाराच्या पाठीशी राहू द्या. आता नवीन सदस्य आमच्या परिवारात येतोय तर त्याच्यावर किंवा तिच्यावर सुद्धा राहू द्या”.