Mamta Kulkarni Video : शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर ‘करण अर्जुन’ चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी अनेक वर्षांपासून अज्ञात होती. ही अभिनेत्री नेमकी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. गेली अनेक वर्ष ही अभिनेत्री अभिनय जगतापासून दूर होती. यानंतर आता अभिनेत्री पुन्हा परतली असल्याचं समोर आलं आहे. अखेर २५ वर्षांनंतर ही अभिनेत्री भारतात परतली आहे. याबाबत स्वतः ममताने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली आहे. ममता कुलकर्णीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने २५ वर्षांनी भारतात परतल्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ममताने इंस्टाग्रामद्वारे शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती म्हणताना दिसत आहे की, “मी ममता कुलकर्णी आहे आणि मी २५ वर्षांनी भारतात, बॉम्बे, मुंबई आणि आमची मुंबईला आले आहे”. तिने सांगितले की याआधी एकदा भारतात आली होती आणि आता २०२४ मध्ये ती पुन्हा भारतात आली आहे. ‘करण अर्जुन’ अभिनेत्रीने नमूद केले की जेव्हा फ्लाइट लँड होणार होती तेव्हा ती भावूक झाली, कारण तिने २४ वर्षात पहिल्यांदा तिचा देश आकाशातून पाहिला होता. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून बाहेर पडत आहे, असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – शशांक केतकरच्या लग्नाची सात वर्ष, बायकोसाठी शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला, “सगळं जग एका बाजूला आणि…”
ममताने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, ती एका खास कारणासाठी भारतात आली आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “२५ वर्षांनंतर माझ्या मातृभूमीत परत आले. 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर कुंभमेळ्यात २०१२ मध्ये सहभागी झाले आणि १२ वर्षांनी दुसऱ्या महाकुंभ २०२५ साठी परत आले आहे”. ममता कुलकर्णीने हा व्हिडीओ शेअर करत साऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीच्या कमबॅकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’ची प्रदर्शनापूर्वीच बंपर कमाई, सगळ्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले, आतापर्यंतची कमाई तब्बल…
ममता कुलकर्णीने तिच्या करिअरमध्ये अक्षय कुमारपासून सलमान खानपर्यंत अनेक बड्या स्टार्सबरोबर काम केले आहे. अभिनेत्रीच्या चित्रपटांच्या यादीत ‘वक्त हमारा है’, ‘करण अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘अंजोलन’ आणि ‘बाजी’ यांचा समावेश आहे. ममताचा शेवटचा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. ममता कुलकर्णीबरोबरही अनेक वाद निर्माण झाले होते. तिच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप होता. यामध्ये तिच्या पतीचेही नाव समोर आले होते. या प्रकरणानंतर अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर राहिली.