ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांची कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज अपयशी ठरली. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर महमूद यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्युनिअर महमूद कॅन्सरशी झुंज देत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत पसरला होता आणि त्यामुळे त्यांचं वजनही सतत कमी होत होतं. सध्याची त्यांची अवस्था पाहून बॉलीवूडमधील त्यांचे अनेक मित्र खूप काळजीत असलेले पाहायला मिळाले. (Sachin Pilgaonkar On Junior Mehmood)
काही दिवसांपूर्वीच ज्युनिअर मेहमूद यांनी जितेंद्र व सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही कलाकारांना त्यांच्या या इच्छेबद्दल कळताच त्यांनी तात्काळ मेहमूद यांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी सचिन पिळगावकर यांनी मेहमूद यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. सचिन पिळगावकर यांनी काही मदत लागल्यास बिनधास्तपणे सांगण्याचं आवाहनही यादरम्यान केलं. मात्र सलाम काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहमूद यांच्या मुलांनी त्यांची मदत नाकारली आणि वडिलांसाठी फक्त प्रार्थना करण्यास सांगितलं.
बालकलाकार म्हणून ज्युनिअर मेहमूद आणि सचिन पिळगावकर यांची जोडी फार लोकप्रिय होती. त्यांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावरून भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “माझा बालपणीचा मित्र व सहकलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे दुःखद निधन झाले. त्याच्याबरोबर माझ्या खूप सुंदर आठवणी आहेत, त्या आठवणी कायम माझ्याबरोबर असतील. ओम शांती” असं कॅप्शन देत त्यांनी बालपणीचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे.
याआधीही सचिन यांनी ज्युनियर महमूद यांच्यासाठी पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांनी म्हटलं की, “माझे बालपणीचे मित्र ज्युनिअर महमूद गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कृपया प्रार्थना करा. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. आज मी त्यांना भेटायला गेलो. पण वैद्यकीय उपचारांमुळे ते झोपले होते. मी त्यांचा मुलगा तसेच अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या आरोग्याविषयी जाणून घेत आहे. त्यांच्यावर देवाची सदैव कृपा असावी”, असं लिहीत सचिन यांनी ज्युनिअर यांना भेटायला गेले असल्याचं सांगितलं.