छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका वाढत्या टीआरपीमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे व सायली-अर्जुन यांच्या केमिस्ट्रीमुळे ही मालिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी ही या मालिकेमुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील तितकीच चर्चेत असते.
जुई सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते आणि चाहतेदेखील तिच्याविषयीची प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यात उत्सुक असतात. जुई ही अभिनेत्री असण्याबरोबरच प्राणीप्रेमी व निसर्गप्रेमीदेखील आहे आणि सोशल मीडियाद्वारे ती तिचे प्राण्यांविषयीचे व निसर्गाविषयीचे प्रेम व्यक्त करत असते. अशातच तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत तिचे निसर्गाविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.
जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात माणसामुळे निसर्गाचे कसे विद्रूपीकरण होत आहे याबद्दल देखील सांगितलं आहे. नुकतेच ‘ठरलं तर मग या मालिकेचे माथेरान इथे शूटिंग पार पडले आणि माथेरानचाच एक व्हिडीओ जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “देवाने सुंदर निसर्ग बनवला. प्राणी बनवले. पक्षी बनवले. खूप छान छान गोष्टींची निर्मिती केली आणि त्यानंतर देवाने माणूस बनवला.”
आणखी वाचा – सानिया मिर्झा व शोएब मलिक यांचा घटस्फोट, चर्चा ठरल्या खऱ्या, पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न तेही थाटात अन्..
तसेचं या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये जुईने असं म्हटलं आहे की, “मी बऱ्याचदा हे पाहिले आहे की, लोकं त्यांना पाहिजे तिथे कचरा टाकतात. कचराकुंडीत कचरा टाकण्यावाचून यांना कोण अडवतं? प्लॅस्टिक व इतर कचऱ्याने व्यापलेली अशी सुंदर ठिकाणे पाहून मन हेलावून जाते. मित्रांनो समजूतदार व्हा किंवा तुम्हाला जर कचरा फेकायचा असेल तर अशा सुंदर ठिकाणी जाऊ नका. कचरा इतरत्र टाकणं थांबवता येत नसेल, तर कृपया तोच कचरा आपल्या घरात फेका आणि त्यातच रहा.” यापुढे तिने निसर्गाची काळजी घ्या, तरच निसर्ग आपली काळजी घेईल” असं म्हणत तिने सर्वांना चांगले पर्यटक, चांगले नागरिक व एक चांगला माणूस होण्याचेदेखील आवाहन केले आहे. दरम्यान, जुईने शेयर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.