नाटक, मालिका व चित्रपट यांतून आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. जितेंद्र केवळ अभिनेताच नव्हे, तर उत्तम कवी म्हणून जितेंद्रची ओळख असून विविध कार्यक्रम व सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या कविता प्रेक्षकांसमोर सादर करतो. कवितेच्या माध्यमातून जितेंद्र जोशी समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर अनेकदा भाष्य करताना दिसतो. मात्र, याच कवितांमुळे जितेंद्र जोशी चर्चेत आला आहे. (jitendra joshi angry)
अभिनेता जितेंद्र जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून या माध्यमांतून तो त्याच्या कविता त्याच्याच आवाजात शेअर करताना दिसतो. त्याच्या अनेक कवितांवर अनेक रील बनलेले असून याच गोष्टीवर तो भडकला आहे. जितेंद्रने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यात त्याने स्वतःच्या रीलसाठी त्याच्या आवाज आणि कविता वापरणाऱ्यांनी किमान त्याचे श्रेय तरी द्यायला हवं असल्याचे म्हटलं आहे.
हे देखील वाचा – बहुचर्चित ‘अंकुश’ ॲक्शनपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित, प्रेक्षकांना पाहायला मिळणार अंकुश आणि रावीची हृदयस्पर्शी प्रेमकथा
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये प्रश्न उपस्थित करताना जितेंद्र म्हणतो, “एखाद्याच्या आवाजातली त्याचीच कविता स्वतःचा रील बनवण्यासाठी वापरताना त्या माणसाच्या नावाचा उल्लेख सुद्धा करू नये हे वाटण्याचा निर्लज्जपणा किंवा बेफिकिरी मधून येणारा उद्दामपणा कुठून येत असावा?”

जितेंद्र जोशीची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून त्याचा रोख नेमका कोणावर आहे, हे अदयाप माहिती नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जितेंद्रची त्याच्याच आवाजातली ‘एकाकी एकटाच मी’ ही कविता अनेकांच्या रीलवर दिसत आहे. शिवाय, त्याच्या ‘एकांतातलं एकटे पण’ ही कविताही चांगलीच गाजत आहे. त्यामुळे जितेंद्र या रीलबद्दल बोलत असावा का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ चित्रपटात झळकला होता. ज्याला राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्थान मिळाले होते. जितेंद्र जोशी सध्या वेबसीरिजमध्ये काम करत असून चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरलेले आहे. (Jitendra Joshi)