सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे ती मराठा आरक्षण आंदोलनाची. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. सलग सहा दिवस बेमुदत उपोषण केल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांसह आता कलाकार मंडळींनीही भाष्य करायला सुरूवात केली आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेता रितेश देशमुख, किरण माने यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली आहे. याचबरोबर आता अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. (Hemant Dhome On Maratha Arakshan)
सोशल मीडियावर ट्वीट शेअर करत हेमंत ढोमेने आपलं मतं व्यक्त केलं आहे. “आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय. मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!” असं ट्वीट त्याने केलं आहे.
आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय..
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) October 31, 2023
मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…
त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे!
सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत!
शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये!
जय शिवराय! pic.twitter.com/uTa1OlZ9Sy
हेमंत ढोमे कायमच राजकीय पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत भाष्य करत असतो. अशातच त्याने पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. आणि ‘या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावीत’ असा सल्ला दिला आहे. हेमंत ढोमे यांची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल झालेली पाहायला मिळतेय.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या लढ्याला पाठिंबा दर्शविला आहे. अभिनेता रितेश देशमुख यानं ट्विट करत आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा, असं म्हटलं आहे. तर अश्विनीने “आता नाही तर कधीच नाही” म्हणत साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली आहे. “या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.” असं म्हणत किरण माने यांनी मनोज जरांगे पाटील यांना स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितलं आहे.