मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. अशातच सलग सहा दिवस बेमुदत उपोषण केल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचा लढा हा सुरूच आहे. सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता या सगळ्यातच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे. (Ashvini Mahangade On Manoj Jarange Patil)
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनी अभिनयाव्यतिरिक्त नेहमीच सामाजिक कार्यांमुळे चर्चेत असते. शिवाय शिवप्रेमी अश्विनी गड, किल्ले यांच्या संरक्षणाचे धडेही देताना दिसते. समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा हेतू उराशी बाळगून ती नेहमीच योग्य त्या लढाईत उतरते. अशातच या मराठमोळ्या अभिनेत्रीने मराठा आरक्षणाला न्याय मिळण्याबाबत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना साथ दिली आहे.
अश्विनीने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. अश्विनीने मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाच्या वाई तालुक्यातील साखळी उपोषणात सहभागी होत पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणात सहभागी झाल्याचा एक व्हिडीओ शेअर करत अश्विनीने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “आता नाही तर कधीच नाही. विद्यार्थी, स्वप्नं, मेहनत, परीक्षा, उत्तिर्ण, यश, तरीही अपयश, मग आक्रोश, यातना, मग परत परीक्षा, मग परत सगळे तेच आधीचे पाढे आणि मग आत्महत्या. हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे. या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे.”
तर अश्विनीच्या उपोषणात दर्शविलेल्या पाठिंब्याबद्दल तिचं अनेकांनी कमेंट करत कौतुक केलं आहे. अश्विनीशिवाय मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या लढ्याला पाठिंबा दर्शविलेला पाहायला मिळतो. अभिनेता रितेश देशमुख यानं ट्विट करत आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा, असं म्हटलं आहे. तर अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिलं लढ्याला पाठिंबा देत म्हटलं आहे, “या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणाऱ्या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करत आहेत!”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितलं आहे.